वणी टाईम्स न्युज : आईवडील निंदनीच्या कामात मग्न असताना बेपत्ता झालेल्या त्या चिमुकल्याचा अखेर मृतदेहच आढळला. लहान भावासोबत खेळता खेळता शेतातील विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला. यवतमाळ येथील रेस्क्यू पथकाने विहिरीत गळ टाकून चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढताच आईवडिलांनी हंबरडा फोडला. रूद्रा संजय बोरकर (6) असं या दुर्देवी घटनेत मृत पावलेल्या चिमुकल्याचा नाव आहे.
केळापूर तालुक्यातील सोनुर्ली येथील संजय बोरकर व त्याची पत्नी किरण रविवारी सकाळी शेतात निंदणीच्या कामासाठी गेले होते. बोरकर दांपत्याचे दोन्ही मुलं रुद्रा (6) आणि स्वराज (3) लहान असल्यामुळे त्यांनी दोघांना आपल्या सोबत शेतात नेले. संजय व किरण कपाशीची निंदण करीत असताना दोन्ही त्याचे दोन्ही मुलं शेतातच खेळत होते. मात्र 3 वाजता दरम्यान त्यांचा मोठा मुलगा रुद्रा अचानक गायब झाला.
शेतात आणि गावात शोध घेऊनही चिमुकल्याचा काही शोध लागला नाही. तेव्हा वडील संजय बोरकर यांनी वडकी पोलीस स्टेशन गाठून त्यांच्या अबोध मुलाला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. मुलगा हरविल्याबद्दल वडकी पोलिसांनी मुलाच्या छायाचित्रासह शोधपत्र जारी केले. सोमवारी सकाळी यवतमाळ येथून आलेल्या रेसक्यू पथकाने विहिरीत गळ टाकून शोध मोहीम सुरु केली. आणि अखेर त्या चिमुकल्या रूद्राचा मृतदेह गळमध्ये अडकला. निरागस मुलाच्या मृत्यूमुळे सोनुर्ली गावात शोककळा पसरली.