वणी : उपविभागात वणी, शिरपूर व मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील एका वर्षापासून विद्युत तारा व लोखंडी खांब कापून चोरी गेल्याची अनेक तक्रारी महावितरण कंपनीतर्फे दाखल करण्यात आली आहे. मात्र शासकीय मालमत्तेची चोरी करणारे एकही आरोपी अद्याप पोलिसांना गवसले नाही. विशेष म्हणजे जिवंत विद्युत तारा कापून चोरी करण्याच्या प्रयत्नात तीन युवकांचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडल्याची माहिती आहे. मृत्युमुखी पडलेले युवक मुख्य चोरट्यांचे म्होरके असल्याचे बोलले जाते. विद्युत तार चोरी व मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी युवसेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी उप विभागीय पोलीस अधिकारी मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन केली आहे.
वणी शहरात भंगार चोरट्यांचा रॅकेट सक्रीय असून कटर व वेल्डिंग मशिनच्या साहाय्याने विद्युत विभागाचे अल्म्युनियमचे तारा व लोखंडी खांब कापून भंगार व्यावसायिकांना विकले जाते. भंगार व्यावसायिकांकडून खरेदी केलेल्या मालाची रातोरात विल्हेवाट लावली जात असल्याचे बोलले जाते. जिवंत विद्युत तारा कापताना विजेचा शॉक लागून काही चोरट्यांच्या मृत्यू झाल्याची घटनासुद्धा घडली आहे. मुकुटबन परिसरात परसोडा येथे विद्युत तारा कापण्याच्या प्रत्यन करत असताना 18 नोव्हे. रोजी शंकर सुपारी कुमरे नावाच्या युवकाचा दुर्देवी मृत्यू झाला.
चालू विद्युत लाईनचे तार चोरट्यांकडून कापून नेल्यामुळे अनेक गावाचा विद्युत पुरवठासुद्धा खंडित होते. शिवाय चोरट्यांकडून शेतातील मोटार, स्प्रिंकलर, झटका मशीन, तार कंपाउंड चोरीच्या अनेक घटना या विभागात घडत आहे. विद्युत विभाग व शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीची पोलिसांकडून दखलसुद्धा घेतली जात नाही. त्यामुळे चोरी करून घेणारे मुख्य आरोपी अद्याप मोकाट फिरत आहे. विद्युत तारा व खांब चोरीची तसेच चोरी करताना मृत्य झालेल्या प्रकरणची सखोल तपास करून गुन्हेगारांवर आठ दिवसात कारवाई करावी, अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयसमोर धरणे आंदोलन करण्यचा इशारा अजिंक्य शेंडे यांनी दिला आहे.