वणी टाईम्स न्युज : वणी रेल्वे स्थानकाचे प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या टप्पावर एका तरुणीचा शिर व धड वेगळा मृतदेह आढळला. तरुणीने मुंबई ते बल्लारशाह जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसच्या खाली स्वतःला झोकून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. रश्मी धनराज पराते (20), राह. शास्त्रीनगर, वणी असे मृत तरुणीचे नाव आहे. सदर घटना सोमवार 5 एप्रिल रोजी सकाळी 12 वाजता दरम्यान उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार बल्लारशाह ते मुंबई जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस (11002) ही गाडी सकाळी 10.40 वाजता वणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर पोहचली होती. परंतु मुंबई ते बल्लारशाह जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस (11001) ही रेल्वे समोरुन येत असल्यामुळे या ट्रेनला तब्बल 45 मिनिट प्लॅटफॉर्मवर थांबविण्यात आले. वणी रेल्वे स्थानकाचे प्लॅटफॉर्म लहान असल्यामुळे या स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक रेल्वे गाडीला दोन वेळा थांबा देण्यात येते. दरम्यान जेव्हा पहिल्यांदा ही गाडी थांबली त्याच वेळी तरुणी प्रवाशांची नजर चुकवून डब्ब्याखाली रुळावर डोकं ठेवून झोपली असावी. असा अंदाज आहे.
दोन्ही ट्रेन आपल्या गंतव्याकडे निघाल्यानंतर काही मजुरांचा रुळावर पडलेल्या तरुणीच्या मृतदेहाकडे लक्ष गेला. त्यांनी तत्काळ याबाबत स्टेशन प्रबंधक यांना माहिती दिली. स्टेशन प्रबंधक प्रेमकुमार रंजन यांनी घटनेची माहिती रेल्वे सुरक्षा बल व वणी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. तरुणीने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जाते. मात्र अद्याप कारण स्पष्ट झाले नाही