सुशील ओझा, झरी : धावत्या दुचाकीच्या समोर अचानक रानडुकर आडवं आल्याने घडलेल्या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला. तर दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मुलगा व एक व्यक्ती जखमी झाले. सदर अपघात पांढरकवडा ते माथार्जून मार्गावर सोमवारी रात्री 8 वाजता दरम्यान घडले. स्वामी गुम्मलवार (48) रा.माथार्जून असे या अपघातात मृत व्यक्तीचे नाव आहे. दुचाकीच्या धडकेने रानडुकर ही ठार झाल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार माथार्जून येथील स्वामी गुम्मलवार हा चारचाकी वाहनाचे पार्टस दुरुस्तीसाठी आपल्या मुलासह पांढरकवडा येथे गेला होता. पांढरकवडा येथे काम आटोपून सायंकाळी परत जाताना त्यांनी मेकॅनिकला सोबत घेतला. रात्री 8 वाजता कोडपाखिंडी गावाजवळ एका शेतातून अचानक रानडुकराचा कळप रस्त्यावर आला. त्यामुळे स्वामी यांची दुचाकी एका रान डुकरावर जोराने आदळली. यात दुचाकीवरील तिघजण रस्त्यावर कोसळले. दुचाकी चालक स्वामी गुम्मलवार यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मुलगा व मेकॅनिक किरकोळ जखमी झाला.