सुशील ओझा, झरी : वन क्षेत्रातून रेती चोरण्याचा आरोप करीत ट्रॅक्टर चालकाला दमदाटी करून 40 हजार रुपये उकळणारी हिरापूर बीट मधील महिला वनरक्षकावर कारवाई करण्याची मागणीसाठी झरी तालुक्यातील अडेगाव येथील ग्रामस्थ 24 मार्च पासून उपोषणावर बसणार आहेत. 2 मार्च रोजी रात्री महिला वनरक्षक सुलभा जुनघरे (हिरापूर बीट),वनमजूर अमोल टोंगे व स्वप्नील खडसे यांनी कवडू गोहणे (27) रा. अडेगाव याला रेती भरलेला ट्रॅक्टर घेऊन जात असताना अवैधरीत्या पकडून दमदाटी तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.
ट्रॅक्टर वन विभागाच्या हद्दीत नसताना ट्रॅक्टर सोडण्यासाठी कवडू गोहणे यांचेकडून 80 हजाराची मागणी करण्यात आली. मात्र नंतर 40 हजार रुपयात तडजोड करुन बळजबरीने पैसे उकळण्यात आले. याबाबत सहाय्यक वन संरक्षक मुकुटबन यांच्यासह पांढरकवडा येथील वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना लेखी तक्रार करून महिला वनरक्षक सुलभा जुनघरे हिला निलंबित करण्याची व दोन्ही वन मजूरांना कामावरून कमी करण्याची मागणी करण्यात आली. मात्र तक्रार करूनही वन विभागाने लाचखोर महिला वनरक्षकाविरुद्द कोणतीही कारवाई केली नाही.
वन विभाग दोषी कर्मचाऱ्यांची पाठराखण करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थाने 24 मार्च पासून सहा. वनसंरक्षक कार्यालय वणी समोर आमरण उपोषणावर बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबत बंडू गोहणे, रवी गाडामोडे, दिनेश जीवतोडे, मंगेश पाचभाई, देवानंद गाडामोडे, विकास घाटे, अंकित डोहे, जगदीश चांदेकर, प्रमोद ताजने यांनी वन विभागाला कळविले आहे.