वणी टाईम्स न्युज : समोर जात असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी स्लीप होऊन ट्रक खाली सापडली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एका अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील एक तरुण गंभीर जखमी झाला. वणी घूग्गुस चंद्रपूर महामार्गावर बेलोरा फाट्याजवळ रविवारी सायंकाळी 5.30 वाजता दरम्यान हा अपघात घडला. मुन्ना उर्फ जित अजय गोवर्धन (17) रा. मुरसा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचा नाव आहे. तर प्रणय शंकर नवले (20) रा.मुरसा, ता. भद्रावती हा तरुण गंभीर जखमी झाला. दुचाकी वरील हर्षल अर्जूनकर (20) हा तरुण सुदैवाने वाचला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भद्रावती जिल्ह्यातील 3 तरुण होंडा लिओ मो. सा. क्रमांक MH34-BQ 2947 या दुचाकीवर वणीच्या दिशेने येत होते. घुग्गुस ते वणी दरम्यान बेलोरा फाट्याजवळ समोर जात असलेल्या कोळशाच्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी स्लीप होऊन ट्रकच्या मधील चाकात सापडली. या अपघातात अल्पवयीन तरुण मुन्ना गोवर्धनच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने तो जागीच गतप्राण झाला. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले, तर गंभीर जखमी तरुण प्रणय नवले याला उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविले. पोलिसांनी विकास कोल ट्रान्सपोर्टचा ट्रक क्रमांक MH34- BG 3783 जप्त करुन ट्रक चालक विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.