जितेंद्र कोठारी, वणी : देव तारी त्याला कोण मारी या उक्ती प्रमाणे वणी येथील 32 विद्यार्थ्यासह 40 जणांचे प्राण थोडक्यात बचावले. रात्रीच्या घुप्प अंधारात धावत्या बालाजी ट्रॅव्हल्स बसच्या चालकाला काही तरी गडबड असल्याचे जाणविले. त्यांनी बस थांबवून बघितले तर चालक बाजूच्या मागील चाकाच्या सर्व नटबोल्ट तुटून पडले होते. चाकाला फक्त एकच बोल्टचा आधार उरला होता. सुदैव म्हणजे एका नटबोल्टच्या भरवश्यावर बसने तब्बल 10 ते 12 किमी प्रवास केल्याचे प्रवश्यानी सांगितले.
यवतमाळ वणी मार्गावर मोहदा जवळ मंगळवारी पहाटे 5 वाजता दरम्यान ही घटना घडली. घटनेच्या वेळी ट्रॅव्हल्स बसमध्ये वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील 32 विद्यार्थ्यांसह 40 जण साखर झोपेत होते. जर चाकाचे नट निघाल्याचे चालकाच्या लक्षात आले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती. परंतु सुदैवाने बस मधील सर्व सुखरूप बचावले
वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील 29 विद्यार्थिनी 3 विद्यार्थी व 2 प्राध्यापक, 2 कोच, 3 वादक व कर्मचारी युवा महोत्सवात भाग घेण्यासाठी वणी येथील बालाजी ट्रॅव्हल्सच्या बस क्रमांक MH12 DT 2451 या बसमध्ये 26 सप्टेंबर रोजी अकोला येथे गेले होते. अकोला जात असतानाही यवतमाळ येथे टायर पंचर झाला होता. आणि परत येताना मोठी दुर्घटना टळली.