वणी टाईम्स न्युज : मंदिरात दर्शनासाठी जात असताना भरधाव दुचाकी चालकाने धडक दिल्याने गंभीर जखमी देशमुखवाडी वणी येथील नागोराव आवारी यांचे उपचारा दरम्यान नागपूर येथे निधन झाले. वरोरा रोड लोकमान्य टिळक महाविद्यालय समोर बुधवारी सकाळी 11 वाजता दरम्यान हा अपघात घडला होता. मृतक नागोराव आवारी हे भारतीय जनता युवा मोर्चाचे पूर्व अध्यक्ष अवि आवारी यांचे वडील तसेच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ता होते.
प्राप्त माहितीनुसार नागोराव आवारी हे दररोज प्रमाणे वरोरा रोडवरील जगन्नाथ महाराज मंदिरात दर्शनासाठी जात होते. दरम्यान टिळक महाविद्यालय समोर स्कुटीवर रस्ता क्रॉस करताना भरधाव येणाऱ्या दुचाकीने त्यांना जबर धडक दिली. यात गंभीर जखमी नागोराव आवारी यांना लोढा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. नागपूर येथील खाजगी हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरु असताना दुपारी 2.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे मागे पत्नी, मुलगा, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज वणी येथील मोक्षधाम मध्ये अंत्य संस्कार करण्यात येणार आहे. अपघातात कारणीभूत दुचाकी चालकाचा पोलीस शोध घेत आहे.
नांदेपेरा रोड वरील घटनेची पुनरावृत्ती
काही वर्षा पूर्वी नांदेपेरा मार्गावर घडलेल्या घटनेत अल्पवयीन दुचाकी चालकाने धडक दिल्याने काँग्रेस नेते प्रमोद वासेकार यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. बुधवारी वरोरा मार्गावर पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती होऊन नागोराव आवारी यांना जीव गमवावा लागला. अपघाताच्या निमित्याने नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
बेछूट दुचाकी चालकांना आवरणार कोण?
शहरात अनेक अल्पवयीन मुलं, मुली तसेच टपोरी पोरं धूम स्टायल आणि ट्रिपल सीट बसून दुचाकी चालवताना दिसत आहे. मात्र या जीवघेण्या दुचाकी चालकांवर ट्रॅफिक पोलीस किंवा शहर पोलीस कुठलीही कारवाई करत नाही. शहरातील वरोरा रोड तसेच ट्युशन कलासेज असलेल्या रस्त्यांवर हे दृश्य नेहमीचे आहे. मात्र ट्रॅफिक पोलिसांच्या डोळ्यावर पट्टी बांधून आहे की काय ? वाहतूक शाखेवर महिला पोलिस अधिकाऱ्याच्या नेमणूकीनंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाल्याचे बोलले जाते.