वणी टाईम्स न्युज : हिंगोली जिल्ह्यातील आडगावमध्ये तलाठ्याची निर्घृण हत्येच्या निषेधार्थ वणी उप विभागातील सर्व तलाठ्यांनी गुरुवारी एक दिवसीय कामबंद आंदोलन पुकारला. विदर्भ पटवारी संघ, नागपूर उपशाखातर्फे तलाठ्यांनी उप विभागीय अधिकारी आणि तहसीलदार वणी यांना निवेदन देऊन तलाठी संतोष पवार यांच्या हत्येचा निषेध प्रकट केला. दोषींवर जलदगती न्यायालयात खटला चालविण्याची मागणी पटवारी संघाने केली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील आडगाव साजाचे तलाठी संतोष देवराव पवार (36) हे आपल्या कार्यालयात बसून असताना शेतीविषयक कागदपत्रासाठी आलेल्या एकाने तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना बुधवारी 28 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. जखमी तलाठ्याला परभणी येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेचा निषेध म्हणून विदर्भ पटवारी संघ नागपूर -2 तर्फे दिनांक 29 रोजी वणी उप विभागातील सर्व तलाठ्यांच्या एक दिवसीय कामबंद आंदोलन पुकारण्यात आला. यावेळी विदर्भ पटवारी संघ वणीचे अध्यक्ष नितेश पाचभाई, सचिव सत्यानंद मुंडे, विशाल मोहितकर, सुनील उराडे, रमेश राऊत, चंद्रशेखर मसराम, रवींद्र उपरेसह वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील अनेक तलाठी उपस्थित होते.