जितेंद्र कोठारी, वणी : युवा अवस्था ही आपल्या जीवनातील सर्वात महत्वाची अवस्था. सळसळते रक्त, आकाशाला गवसणी घालण्याची तयारी, मोठमोठी स्वप्ने पाहणे आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करायची तयारी असणे ही तारुण्याची लक्षणे आह. ज्या लोकांनी आयुष्यात मोठ मोठी स्वप्ने पाहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी कष्ट घेतले, ती माणसे जगात महान ठरली आहेत. आयुष्याला आकार देण्याच्या याच काळात आज युवक गुन्हेगारीकडे अग्रेसर होताना दिसत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारीकडे वळणारी तरुणाईचे पाऊले रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून यवतमाळ जिल्हा पोलिस दलातर्फे ‘ऑपरेशन प्रस्थान’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमात शाळा, कॉलेज सोडलेले तसेच भरकटलेले व वाममार्गाला लागलेले तरुण व बेरोजगार युवकांसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 17 ते 22 फेब्रुवारी दरम्यान यवतमाळ, पुसद, उमरखेड, केळापूर व वणी येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यात 8 वि ते 12 वी पास किंवा नापास युवकांसाठी सुरक्षा रक्षक पदासाठी मुलाखत घेण्यात येणार आहे. तर सुरक्षा पर्यवेक्षक पदासाठी पदवीधर आणि NCC ‘C’ सर्टिफिकेट प्राप्त उमेदवाराची नोंदणी करण्यात येणार आहे. वणी, मारेगाव आणि झरी जामणी तालुक्यातील युवकांसाठी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी शेतकरी मंगल कार्यालय वणी येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ऑपरेशन प्रस्थान व रोजगार मेळाव्याची अधिक माहितीसाठी वणी, मारेगाव, मुकुटबन, शिरपूर व पाटण पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा. असे आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात आले आहे.