वणी टाईम्स न्युज : अपघात, चोरी तसेच फसवणुकीसह इतर काही प्रकरणात पोलिसांनी कारवाई केल्यानंतर अनेकदा संबंधित वाहने जप्त केली जातात. तर, वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांवरही कारवाई केली जाते. दंडात्मक कारवाई करून अशी वाहने सोडून दिली जातात. मात्र, गंभीर प्रकरणात सदर वाहनांवर खटला दाखल करून ती जप्त केली जातात. या वाहनांवरील कार्यवाही पूर्ण करून वाहनधारकांनी संबंधित वाहन सोडून घेणे अपेक्षित असते. मात्र, जप्त केलेली अनेक वाहने वर्षानुवर्षे सोडवली जात नाहीत. तसेच त्यावरील कर, दंड भरला जात नाही.
त्यामुळे ती वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात वर्षानुवर्षे पडून असतात. शहरात पोलीस ठाण्यांच्या आवारात अनेक वाहने वर्षानुवर्षे एकाच जागेवर असल्याने कुजली आहेत. न्यायालयातून प्रकरण खारीज केल्यानंतरही नागरिक वाहने नेत नाहीत. यामुळे पोलीस स्टेशन आवारात जागा कमी पडत आहे. सदरचा मुद्देमाल खूप दिवसांपासून पोलीस स्टेशनला जमा असून जंग लागून खराब होण्याची प्रक्रिया सुरू असल्याने न्यायालयाचे आदेशाने पोलिसांकडून या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे.
पोलीस स्टेशन वणी येथे बेवारस स्थितीत TVS व्हिक्टर मोसा क्रमांक MH34 P 3191, बिना नंबरची हिरो होन्डा स्प्लेन्डर, होन्डा फॅशन प्लस मोसा क्रमांक MH34 Y 3483 तसेच 400 किलो बेवारस लोखंडी भंगारचे दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी नियमाप्रमाणे लिलाव केले जाणार आहे. तरी सदर दुचाकी वाहन व भंगार खरेदी करण्यास इच्छुकांनी 16 फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन वणी येथे हजर रहावे. असे आवाहन ठाणेदार पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी केले आहे.