वणी टाईम्स न्युज : शहरात ठिकठिकाणी शासकीय व खाजगी इमारतीवर लावण्यात आलेले होर्डींग्ज व बॅनरवर उद्यापासून पालिकेचा कटर चालणार आहे. याबाबतचे आदेश नगर परिषद मुख्याधिकारी यांनी काढले असून खाजगी व्यक्ती मार्फत गॅस कटर व इतर साधनाने अनधिकृत तसेच नूतनीकरण न केलेले होर्डींग्ज कापण्यात येणार आहे. तसेच विना परवाना व शुल्क न भरता ठिकठिकाणी लावलेले शुभेच्छा बॅनर काढण्याची कारवाई नगर परिषद तर्फे सुरु करण्यात आली आहे.
घाटकोपर होर्डींग्ज दुर्घटनेनंतर राज्य शासनाच्या आदेशाने शहरातील सर्व होर्डींग्जची स्ट्रॅक्चल ऑडिट करण्यात आली. ऑडिट अहवालानंतर टिळक चौक, शासकीय धान्य गोडाऊन समोर आणि बस स्थानक परिसरातील लोखंडी होर्डींग्ज धोकादायक आढळले आहे. सदर होर्डींग्ज गॅस कटरच्या सहाय्याने काढले जाणार आहे.
धोकादायक होर्डींग्ज व हुतात्मांच्या प्रतिमासमोर लावण्यात आलेले बॅनर तात्काळ काढण्याची मागणी माजी नगरसेवक सिद्दिक रंगरेज यांनी केली होती. त्यावर कारवाई करत नगर परिषद ॲक्शन मोड मध्ये आल्याची चर्चा आहे.
शुभेच्छा बॅनरमुळे वाहतुकीस अडथळा
शहराच्या हद्दीत साधनकरवाडी ते रेल्वे स्टेशन पर्यंत स्ट्रीटपोलवर दररोज नवनवीन फ्लेक्स झळकत असतात. शिवाय नांदेपेरा रोड, बस स्थानक समोर, टिळक चौक, आंबेडकर चौक, महाराष्ट्र बँक चौक, टागोर चौक, यात्रा मैदान परिसर, जटाशंकर चौक, खाती चौक येथे वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे राजकीय नेत्यांचे, दुकानांचे, कार्यक्रमाचे, वाढदिवस शुभेच्छा बॅनर लावण्यात येते. उठसूट बॅनर लावणाऱ्या व्यक्ती, संस्थेवर नगर परिषद व वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाई करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.