जितेंद्र कोठारी, वणी : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत आहे. शिव जन्मोत्सव कार्यक्रमाला कोणताही गालबोट लागू नये याकरिता वणी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व अनुज्ञप्ती धारक दारू दुकाने, बार, वाइन शॉप दुपारी 4 वाजता पासून बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे आदेशाने वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी याबाबत सर्व अनुज्ञप्ती धारकांना लेखी पत्र दिले आहे.
आदेशानुसार पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सी.एल.-3, एफ. एल. -3, सी.एल.-2, एफ. एल. -2 तसेच बियर शॉपी सोमवार 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेनंतर बंद राहणार आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्ती धारकांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये अटी व शर्ती भंग करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच कायम स्वरुपी परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येईल. याची सर्व अनुज्ञप्ती धारकानी नोंद घ्यावी. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.