जितेंद्र कोठारी, वणी : वणी येथे घडलेल्या गोवंश हत्या प्रकरणाची चौकशीसाठी राज्य गोसेवा आयोगाने नेमलेली 4 सदस्यीय समिती आज शहरात धडकली. समितीचे सदस्यांनी येथील विश्रामगृहात पोलीस, पालिका प्रशासन, महसूल, आरोग्य अधिकाऱ्यांची मुलाखत घेऊन त्यांचे बयान नोंदविले. यावेळी विविध सामाजिक व धार्मिक संघटनांनी समितीला निवेदन देऊन गोहत्येसाठी जबाबदार आरोपींना कठोर शिक्षा करणे, घटनेची चौकशीत हयगय करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, यापुढे शहरात अशी कोणतीही घटना घडणार नाही याची उपाय योजना करणेसाठी निवेदन दिले.

त्यानंतर समितीने ज्या जागेवर गोहत्येची घटना उघडकीस आली, त्या जत्रा मैदान परिसराचा दौरा करून घटनास्थळ पंचनामा केला. घटनेचे 10 दिवसानंतर ही सदर ठिकाणी गोवंश अवशेषांचा अक्षरशः सडा पडलेला समिती सदस्यांना दिसून पडला. त्यामुळे त्यांनी पालिका प्रशासनावर तीव्र नाराजगी व्यक्त केली. समितीला कत्तल करण्यात आलेल्या अनेक गोवंशाच्या कानात टोचलेले बिल्ले घटनास्थळी आढळले. ते त्यांनी जप्त केले.
वणी येथे शेकडो गोवंश हत्या प्रकरणाची गोसेवा आयोगाने गंभीरतेने दखल घेतली असून सदर प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे समिती सदस्यांनी सांगितले यावेळी श्रीराम नवमी उत्सव समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल जैन समाज, स्वाभिमान भारत न्यास, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे समितीला निवेदन देण्यात आले.
पोलिस व प्रशासनाची भूमिका चुकीची..
गोवंश हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली. मात्र आरोपींवर कायद्याची प्रभावी कलम न लावता मामुली कलमा लावण्यात आली. त्यामुळे गोहत्येचा गंभीर आरोप असताना न्यायालयाकडून आरोपींना जामीन मिळाली. आरोपींवर पशू क्रूरता निवारण अधिनियमासह सांप्रदायिक सौहार्द बिघडविण्याची कलम तसेच ममोका अंतर्गत गुन्हा दाखल केला असता तर त्यांना जामीन मिळाला नसता. असा दावा गोसेवा आयोग समिती सदस्य मनीष वर्मा यांनी केला. तसेच नगर पालिकेच्या मालकीच्या जागेवर सर्रास कत्तलखाना सुरु असताना पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याची दखल समितीने घेतली आहे.
सामाजिक संघटनांचा पोलिसांवर गंभीर आरोप
गोसेवा आयोग समितीला निवेदन देण्यासाठी विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी विश्रामगृहात पोहचले होते. समिती सदस्यांना निवेदन देताना त्यांनी येथील पोलीस विभागाची निष्क्रियतेमुळे गोवंश हत्या होत असल्याचा आरोप केला. गोवंश जनावर तस्करांकडून पोलीस हप्ता घेत असल्याचा तसेच गोवंश हत्या तपासात शिथिलतेसाठी पोलिसांनी तोडी केल्याचा गंभीर आरोप निवेदनकर्त्यानी समितीपुढे केला. घटनेसाठी जबाबदार दीपक टॉकीज चौपाटीचे बीट जमादार यास अद्याप निलंबित करण्यात आले नसल्याची तक्रारही समितिकडे करण्यात आली.