जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील मोहदा येथे गिट्टी खाणीच्या साचलेल्या पाण्यात बुडून 15 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार 4 मार्च रोजी दुपारी घडली. खाणीच्या पाण्यामध्ये कपडे धुत असताना मुलीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. विद्या अनिल आडे (15) रा. मोहदा, ता. वणी असे मृत बालिकेचा नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार विद्या आडे ही बालिका मैत्रिणी सोबत गुरुवारी दुपारी 11 वाजता दरम्यान गावालगत राजूरकर क्रेशर यांच्या दगड खाणीत कपडे धुण्यासाठी गेली होती. काठावर बसून कपडे धुत असताना अचानक तिचा पाय घसरला आणि ती खोल पाण्यात पडली. विद्याला पाण्यात बुडताना पाहून तिच्या मैत्रिणीने आरडाओरड केली. त्यामुळे नागरिक धावत सुटले. काही युवकांनी पाण्यात उडी मारुन तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. घटनेबाबत शिरपूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
खाण सुरक्षा नियमांना तिलांजली –
मोहदा येथे अनेक गिट्टी क्रेशर असून गावाच्या आजूबाजूला शासकीय आणि खासगी जागेवर शेकडो दगड खाणी आहेत. खाण मालकांकडून कालबाह्य आणि लिज संपलेली शेकडो फूट खोल अनेक खाणी उघडीच सोडण्यात आलेली आहे. त्या खाणींमध्ये पावसाळयात साचलेल्या पाण्यामध्ये गावातील महिला कपडे धुण्यासाठी जातात. तसेच जनावरसुद्धा पाणी पिण्यासाठी त्या खाणींमध्ये प्रवेश करतात.
खाण सुरक्षा नियमानुसार चालू व बंद असलेल्या खाणीच्या चारही बाजूंनी तारांचा कुंपण लावणे गरजेचे आहे. तसेच खाणीच्या प्रवेश द्वारवर सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी लागते. जेणेकरून कोणीही व्यक्ती किंवा जनावर खाण क्षेत्रात प्रवेश करणार नाही. मात्र मोहदा येथील बहुतांश खाण मालकांकडून खाण सुरक्षा नियमांना तिलांजली देऊन दगड उत्खनन करण्यात येते. त्यामुळे मोहदा येथे यापूर्वीही अशी अनेक घटना घडल्या आहेत. खनिकर्म विभाग आणि खाण मालकांच्या साटेलोटे असून मोहदा येथील उघड्या खाणींमुळे नागरिकांचा जीव जात असल्याच्या आरोप मोहदा येथील करीत आहे.