वणी टाईम्स न्युज : वणी येथे गोवंश जनावरांची अवैधरीत्या कत्तल प्रकरणाची सखोल चौकशीसाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन गोसेवा आयोगाने गठित केलेली चार सदस्यीय समिती सोमवार 20 जानेवारी रोजी वणी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळाली आहे. समितीचे सदस्य घटनास्थळाचा दौरा करुन पुलिस प्रशासन, विविध हिंदू संघटना, गौरक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत.
उल्लेखनीय आहे की, दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी शहरातील जत्रा मैदान परिसरात रस्त्यालगत गाईचे दोन कापलेले मुंडके व मोठ्या प्रमाणावर गोवंश जनावरांचे अवशेष आढळले होते. राज्यात गोवंश हत्याबंदी असताना शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तली होत असल्याची घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली होती. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन गोसेवा आयोगाकडून चार सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीत महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अशासकीय सदस्य शेगाव येथील उद्धव नेरकर, औरंगाबाद येथील मनीष वर्मा, विधी सल्लागार म्हणून वणी येथील ऍड. आतिश कटारिया व सदस्य सचिव म्हणून जिल्हा पशू संवर्धन उपायुक्त, यवतमाळ यांची नेमणूक करण्यात आली आहे. समिती यवतमाळ जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या कामाचा आढावा तसेच वणी येथील घटनेची चौकशी करणार आहेत. अवैध गोवंश कत्तल प्रकरणाची चौकशी करून समिती 24 जानेवारी पर्यंत गोसेवा आयोगाला अहवाल सादर करणार आहे.