वणी टाईम्स न्युज : मुंबई येथील घाटकोपर भागात घडलेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगर परिषद क्षेत्रात अवैधरीत्या व धोकादायक स्थितीत असलेले होर्डींग्ज काढण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. मात्र वणी शहरात आजही अनेक ठिकाणी धोकादायक असलेले होर्डींग्ज काढण्यात आले नाही. राज्यात मान्सून दाखल झाला असून पाऊस आणि वाराधुंदमुळे होर्डींग्ज कोसळण्याची भीती लक्षात घेता माजी नगर सेवक सिद्दिक रंगरेज यांनी होर्डींग्ज व बॅनर काढण्याची मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी यवतमाळ व मुख्याधिकारी न. प. वणी यांनी दिलेल्या निवेदनात रंगरेज यांनी जि. प. शाळा क्रमांक 2 समोर असलेले व्यावसायिक काॅम्पलेक्सवर लावण्यात आलेले मोठे होर्डींग्जमुळे जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच शहरातील अनेक ठिकाणी हुतात्मांच्या पुतळ्यांसमोर शुभकामना व जाहिरात बॅनर लावून त्यांची अवमानना होत असल्याचे नमूद केले आहे.
शहरात ठिकठिकाणी बेकायदेशीर व धोकादायक असलेले होर्डींग्ज व बॅनर तात्काळ काढण्याची कारवाई करावी. असा विनंतीवजा निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद वणी यांना देताना सिद्दिक रंगरेज, सुमेर खान, धम्मानंद देठे, मोहिस काजी, जफर बैग उपस्थित होते.