वणी टाईम्स न्युज : येथील नामांकित अल्फोर्स स्वर्णलीला शाळेतील विद्यार्थ्यांकडून आपल्या हाताने तयार केलेल्या पर्यावरण पूरक मातीच्या गणपती मूर्तीचे मोफत वितरण करण्यात आले. शुक्रवारी येथील शिवाजी महाराज चौकात शाळेतर्फे एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व अल्फोर्स स्वर्णलीला विद्यालयाचे प्राचार्य शामसुंदर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर करून आपल्या भाषणातून पर्यावरण जागरूकते बाबत संदेश दिला. उप विभागीय पुलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या हस्ते नागरिकांना गणेश मूर्तीचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
गणपती उत्सव आला की पर्यावरण प्रदूषणचा विषय प्रामुख्याने उपस्थित होतो. प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या मुर्त्या पर्यावरणासाठी खूप घातक असते. वणी तालुक्यात वायू आणि जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी काळ्या मातीपासून स्वतच्या हाताने गणपतीच्या शेकडो प्रतिमा तयार करून नागरिकांना प्रदूषणमुक्त सण साजरा करण्याचा संदेश दिला.