जितेंद्र कोठारी, वणी : यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी बहुल तसेच मागासलेल्या झरीजामणी तालुक्यातील मांगली या छोट्याश्या गावाचे सुपुत्र व सध्या टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), मुंबई येथे कार्यरत शास्त्रज्ञ डॉ. विवेक विजय पोलशेट्टीवार यांचा वणी पुणे लिंक असोसिएशन तर्फे पुणे येथे सत्कार करण्यात आला. बाणेर येथील स्पाइस कोर्ट हॉल मध्ये 29 सप्टेंबर रोजी डॉ विवेक पोलशेट्टीवार यांना शाल श्रीफळ व पुणेरी पगडी देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. विवेक पोलशेट्टीवार यांना 2024 वर्षीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अतिशय मानाचा समजला जाणारा पुरस्कार शांतीस्वरूप भटनागर अवॉर्ड मिळाला आहे . हा पुरस्कार त्यांना 22 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रपती भवन दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. त्याबद्दल वणी पुणे लिंक असोशियन तर्फे डॉ विवेक पोलशेट्टीवार यांचा सत्कार करण्यात आला. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना भारत सरकारतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
या प्रसंगी मूळचे वणी परिसरातील व सध्या पुणे, मुंबई व आजूबाजूच्या परिसरात नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेले सर्व सदस्यांनी परिवारासहित या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला भाभा अणु संशोधन केंद्र येथील सेवानिवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णा सैनीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते, तर विशेष अतिथी म्हणून वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान त्यांनी केलेल्या संशोधनाचे अतिशय सोप्या शब्दात सविस्तर सादरीकरण केले व उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वणी पुणे लिंक असोसिएशन चे संस्थापक सदस्य प्रा. अरविंद कारखानीस यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सौ. प्रांजली कोंडावार यांनी केले, तर आभार प्रदर्शन रवी सरपटवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अरविंद कारखानीस यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पुणे लिंक असोसिएशनच्या राजेश मैलारपवार, प्रशांत झाडे, प्रविण भोयर, अरविंद पारखी, सुभाष लोडे या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
परिचय : डॉ. विवेक पोलशेट्टीवार यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल झरी जामणी तालुक्यातील मांगली या लहानशा खेड्यात झाला. वडील विजय पोलशेट्टीवार हे शेती करायचे. विवेक पोलशेट्टीवार यांचे शालेय शिक्षण मांगली व नंतर मुकुटबन जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी वणी येथे येऊन लोकमान्य टिळक महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून पदवी घेतली. अमरावती विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर डॉ. विवेक पोलशेट्टीवार यांनी ग्वालियर येथून डॉक्टरेट पूर्ण केले. पुढील शिक्षण फ्रांस येथून पूर्ण केल्यानंतर काही वर्षे विदेशातील नामवंत आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम केले.
मात्र मायभूमीच्या ओढीपोटी डॉ. विवेक 2013 साली भारतात परतले व मुंबई येथील नामवंत संस्था टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR ) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम सुरु केले. आत्तापर्यंत डॉ. विवेक यांना देश विदेशातील नामांकित विद्यापीठे व संस्था ह्यंनि विविध पुरस्कारांनी गौरविले आहे. तसेच त्यांनी विविध पुस्तके लिहिली आहे. त्यांनी लिहिलेले लेख आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले आहे. देशविदेशात व्याख्याते म्हणून नेहमी त्यांना आमंत्रित करण्यात येते. संपूर्ण विश्वाला प्रदूषणाच्या समस्याने ग्रासलेले असतांना प्रदूषण पसरविणारे कर्बाम्ल वायू नाहीसे करून त्यातून सोन्याचे कण नाहीसा करून ईतर उपयोगी पदार्थ तयार करता येतात, हे त्यांचे संशोधन संपूर्ण जगाला एक नवी दिशा देणारे ठरले आहे. त्यांच्या याच संशोधनाची दखल भारत सरकारने घेऊन त्यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार देण्यात आला आहे.