वणी टाईम्स न्युज : येथील तहसील कार्यालय परिसरात स्थित सेतू सुविधा केंद्र मागील दोन महिन्यापासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तहसील, पंचायत समिती व न्यायालयीन कामाकरीता येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास व भुर्दंड सहन करावा लागत आहे. सदर सेतू केंद्र पूर्ववत सुरू करण्यात यावा अशी लेखी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे केली आहे.
प्राप्त माहितीनुसार सेतू केंद्रावर गैरप्रकार होत असल्याचे आरोप करून प्रशासनाने दोन महिन्यापूर्वी सेतू सुविधा केंद्राला सील ठोकली होती. मात्र तहसील कार्यालय परिसरात एकमेव सेतू केंद्र बंद झाल्याने विविध दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे. त्यामुळे बंद केलेले सेतू सुविधा केंद्र पूर्ववत सुरु करावं अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कुमार मोहरमपूरी, ऍड. दिलीप परचाके, कडू चांदेकर, एड. विप्लव तेलतुंबडे, अब्दुल निसार, गुलाम रसूल व इतर नागरिकांनी केली आहे.