वणी टाईम्स न्युज : करंजी वणी घुग्गुस चंद्रपूर राज्य मार्गावर बेलोरा फाटा जवळ दुचाकीचा अपघात होऊन 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. सदर प्रकरणी रस्ता बांधकाम व देखभाल करणारी IVRCL चंद्रपूर टोलवेज कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता रवींद्र कांबळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी शिरपूर पोलीस ठाणेदार यांना पोस्टाने निवेदन पाठविला आहे.
करंजी वणी घुग्गुस चंद्रपूर या 85 किमी राज्य मार्गाचे बांधकाम करणारी IVRCL कंपनी करंजी, वणी व धानोरा या 3 ठिकाणी टोल वसूल करीत आहे. सदर रस्त्याची देखभाल, दुरुस्ती करण्याची जबाबदारी IVRCL कंपनीची आहे. मात्र कंपनी फक्त टोल वसूल करण्यात मग्न आहे. रस्त्याच्या बाजूला व डिव्हायडर मधील झाडे कापणे, रस्त्याच्या बाजूला साचलेली धूळ व कोळशाची भुकटी साफ करणे, झाडांना पाणी देणे असे कोणतेही कर्तव्य कंपनी पार पाडत नाही. त्यामुळे या मार्गावर अपघातात वाढ झाली आहे.
सदर राज्यमार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा यांच्या अखत्यारात येत असून या विभागाचे अधिकारी रस्त्याच्या दुर्दशेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या मार्गावर घडणाऱ्या अपघातासाठी सा. बा. विभाग पांढरकवडाचे कार्यकारी अभियंता यांना दोषी मानून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा. तसेच या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या कोळशाच्या वाहनांवर ताडपत्री झाकून कोळसा वाहतूक करण्याची सूचना वेकोलि महाप्रबंधक यांना द्यावी. अशी मागणी वणी येथील सामाजिक कार्यकर्ता रवींद्र कांबळे यांनी केली आहे.