वणी : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या पेनगंगा, उकणी, कोलगाव कोळसा खाणीतून ट्रकद्वारे दररोज हजारो टन कोळशाची वाहतूक होते. शेकडो ट्रकद्वारे दिवस रात्र सुरु वाहतुकीमुळे त्या भागातील 7 गावाची 306 हेक्टर जमिनीवरील शेतीपिके पूर्णपणे प्रदुषणाच्या विळख्यात सापडून नष्ट झाले. वेकोलिच्या धोरणामुळे नष्ट झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी. याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांचे मार्गदर्शनात व तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांचे नेतृत्वात बाधित शेकडो शेतकऱ्यांनी मागील 5 दिवसांपासून येनाडी फाट्यावर कोळसा रोको आंदोलन सुरु केले आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे मागील 5 दिवसापासून कोळसा वाहतूक ठप्प झाली आहे. मात्र प्रशासन व वेकोली अधिकाऱ्यांने शेतकऱ्यांच्या योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणीबाबत अद्याप सकारात्मक भूमिका घेतली नाही. कोळसा वाहतुकीमुळे तालुक्यातील येणक, येनाडी, कोलगाव, शेवाळा, साखरा, शिवणी या गावातील शेती पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. वेकोलिचे क्षेत्रिय महाप्रबंधक ताडाळी (चंद्रपूर) यांनी वणी उपविभागीय अधिकारी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यासह आज आंदोलकांची भेट घेतली. अधिकाऱ्यांनी नियमावर बोट ठेवून हेक्टरी 13 हजार 600 रुपये नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले. मात्र नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई तोकडी असून ही भरपाई मान्य नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी कबुली नाकारली.
जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली तातडीची बैठक
कोळसा वाहतूक रोको आंदोलनामुळे मागील 5 दिवसांपासून कोळसा वाहतूक बंद आहे. तसेच शेतकऱ्यांच्या वाढता रोष लक्षात घेता जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी 12 डिसेंबर रोजी वेकोली व महसूल अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलाविल्याची माहिती आहे. वेकोली अधिकाऱ्यांना आंदोलन हाताळण्यात यश मिळाले नाही. त्यामुळे स्वत: जिल्हाधिकारी यांनी या आंदोलनाची दाखल घेतली आहे.