वणी टाईम्स न्युज : शेतीच्या धुर्यावरून झालेल्या वादातून एका महिलेसह तिच्या पती आणि नणंदीला मारहाण करत अश्लील शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील वांजरी येथे 3 जून रोजी रात्री 9 वाजता घडली. घटनेबाबत फिर्यादी मनीषा देवीदास काकडे (31) रा.वांजरी हिने 21 जून रोजी पोलीस स्टेशन वणी येथे तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी आणि गैर अर्जदार राहुल आनंदराव आसुटकर यांचे शेत लागून आहे. मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये शेतीच्या धुऱ्यावरून वाद सुरू होता. दिनांक 3 जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास राहुलने तिचे पती देवीदास काकडे यांना फोन करून गावातील जेनेकर यांच्या पानठेल्याजवळ बोलावले. तेथे दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपी राहुल आसुटकर यांनी देविदास काकडे याला थापड बुक्क्यांनी मारहाण केली.
पतीला मारहाण करीत असल्याचे पाहून फिर्यादी मनीषा तिची ननंद रत्नमाला सोबत वाद सोडविण्याकरीता गेली असता राहुलने दोघींनाही लाथ मारून ढकलून दिले, त्यानंतर गावातील काही लोकांनी वाद सोडवून दोघांना अलग केले. वाद मिटल्यानंतर घरी जात असताना, राहुलने पुन्हा रत्नमाला हिला पाठीमागून लाथ मारली. तसेच तक्रार देण्यासाठी पतीसोबत पोलिस स्टेशनकडे जात असताना आरोपीने मोटरसायकलला लाथ मारून दोघांना खाली पाडले. तसेच अश्लील शिवीगाळ करत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
फिर्यादी मनिषा देविदास काकडे रा. वांजरी हिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोप राहुल आनंदराव आसुटकर (42) रा. वांजरी, ता. वणी विरुद्ध 351(3), 351(2), 296, 115(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांचे मार्गदर्शनात पीएसआय सुदाम आसोरे करीत आहे.










