वणी टाईम्स न्युज : लग्नाला अवघ्या दोनच महिने झाले असता, विवाहितेने आपल्या पतीसह, सासू, दीर, नणंद आणि नंदई विरुद्ध माहेरून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली. विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बल्लारशाह येथील 5 जणांवर कलम 3(5), 85 BNS नुसार गुन्हा नोंद केला.

फिर्यादी आरती (काल्पनिक नाव) हिचा विवाह 18 फेब्रुवारी 2025 रोजी बल्लारशाह येथील शुभम सोबत झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर पतीची दारू पिण्याची सवयी व इतर कारणांनी घरात वाद उद्भवले. त्यातही एका दिवशी दीराने तिला थापड मारला म्हणून आरतीने बल्लाशाह पोलिसात तक्रार दिली. रिपोर्ट दिल्यामुळे चिडून तिचे पती व सासूसह घराशेजारी राहणारी तिची विवाहित नणंद व तिच्या पतीने तिला मारहाण केली. तसेच तू आमच्या घरात राहू नको. घरात राहायचं असेल तर माहेरून 5 लाख रुपये घेऊन ये. असे म्हणून तिच्या पतीने तिला माहेरी आणून सोडले.
त्यानंतर विवाहितेने 29 एप्रिल 2025 रोजी सासरचे लोकांविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पतीपत्नी मध्ये झालेल्या वादाचा समेट व्हावा म्हणून सदर तक्रार महिला समुपदेशन केंद्र पांढरकवडा येथे वर्ग करण्यात आली. गैर अर्जदार पती व इतर लोकांना तीनदा समुपदेशन केंद्रात बोलाविण्यात आले. मात्र ते तिला सासरी घेऊन जाण्यास तयार झाले नाही. शेवटी पीडित युवतीने पती शुभम, दीर राजा, सासू, नणंद व नंदई विरुद्ध शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात दाखल केली.
पती पत्नीच्या वादात नातेवाईकांना त्रास
हल्ली अनेक कारणांमुळे पती-पत्नीमध्ये वाद होण्याचे प्रकार वाढले आहे. जसे की संवाद कमी असणे, अपेक्षा पूर्ण न होणे, आर्थिक मतभेद, सतत मोबाईल चालविणे, चारित्र्यावर संशय किंवा भूतकाळातील समस्या. काहीवेळा किरकोळ कारणांवरून झालेल्या वादातही महिलेकडून सासरच्या लोकांवर शारीरिक व मानसिक छळ तसेच हुंडा मागणीची तक्रार दाखल केली जाते. यात दोषी व्यक्तीसह नातेवाईक नाहक भरडले जातात. काही ठिकाणी लिपिस्टिकचे रंग व कुरकुरे आणून न दिल्याच्या रागातून पत्नीने थेट नवऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार केल्याचे आढळले.










