वणी टाईम्स न्युज : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे. सीसीआयला कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्याची गर्दी होत आहे. परंतु सीसीआय कडून दररोज ठरलेल्या वेळेपर्यंतच कापूस खरेदी करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांना बाजार समिती आवारात मुक्काम करणे त्रासदायक ठरत आहे.
सोमवार 23 डिसेंबर रोजी दिवस भर खरेदी होऊनही सायंकाळी 150 ते 200 गाड्या शिल्लक राहिल्या. परंतु सीसीआय अधिकाऱ्यांनी वेळेचे बंधन सांगून खरेदी बंद केली. ही बाब माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना कळताच ते बाजार समितीत पोहचले. तिथे शेतकरी बांधवांची अवस्था पाहून त्यांनी लगेच सीसीआयचे अकोला झोनचे मुख्य व्यवस्थापक निरज कुमार यांच्याशी मोबाईल वर संपर्क साधून उर्वरित कापूस गाड्या खरेदी करण्याचा आग्रह केला.
मुख्य व्यवस्थापक यांच्या आदेशानुसार सीसीआय वणी केंद्र प्रमुख हेमंत ठाकरे यांनी बाजार समिती आवारात उभ्या असलेल्या उर्वरित कापूस गाड्या जीनींगमध्ये सोडल्या. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शेतकऱ्याची होणाऱ्या हाल अपेष्टा पासून सुटका मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी माजी आमदार बोदकुरवार यांचे मनापासून आभार मानले.