वणी टाईम्स न्युज : शहरातील मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. साई मंदिर ते वरोरा रोड बाजार समिती पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेले अतिक्रमण काढण्यासाठी 21 अगस्त रोजी मोहीम हाती घेण्यात आली. मात्र बांधकाम विभाग, नगर परिषद आणि इतर सबंधित विभागातील अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याने सदर मोहीम दुसऱ्यांदा फुसका बार ठरली.
सिमेंट रस्त्याच्या बाजूला फुटपाथ आणि नालीवर अतिक्रमण करून व्यवसाय थाटलेल्या सर्व दुकानदारांना मागील महिन्यात अतिक्रमण काढण्याची सूचना देण्यात आली. परंतु त्या सूचनेचा अतिक्रमण धारकांना किंचितही फरक पडला नाही. तेव्हा अतिक्रमण काढण्यासाठी नगरपरिषद कर्मचारी फौजफाटा घेऊन आले असता बांधकाम विभागाचे अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे नगर परिषद कर्मचारी आल्या पाऊली परत गेले.
अतिक्रमण हटविण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी सकाळी दुसऱ्यांदा नगर परिषदचे अधिकारी, कर्मचारी जेसीबी मशीन व ट्रॅक्टर घेऊन टिळक चौकात पोहचले. अतिक्रमण धारकांना आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्या, अन्यथा नुकसान झाल्यास जबाबदार राहणार नाही. अशी जाहीर सूचना लाऊड स्पीकरवर प्रसारित करण्यात आली. सोबतच नगर परिषदचे मुख्याधिकारी, अभियंता, पोलीस कर्मचारी, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता तसेच मजूर शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जमा झाले. अतिक्रमण काढण्याची कार्यवाही थोड्या वेळाने सुरु होणार, असं वाटतं असताना माशी कुठं शिंकली की, सर्व अधिकारी, कर्मचारी, मजूर जेसीबीसह थोड्या वेळाने तिथून गायब झाले.
अतिक्रमण हटाव मोहिम रद्द करणे बाबत नगर परिषदचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांना फोन वरून विचारणा केली असता, त्यांनी दोन शब्दात ‘पोस्पोंड केली’ अस म्हणून फोन ठेवला. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी उप विभागीय अभियंता सुहास ओचावार यांनी अतिक्रमण हटाव मोहीमेची प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी बांधकाम विभाग, नगर परिषद, वीज वितरण, महसूल विभाग आणि पोलीस विभागाची येत्या दोन तीन दिवसात संयुक्त बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थित अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे अतिक्रमण काढण्यासाठी आवश्यक सर्व विभागांचा ताळमेळ बसत नसल्याची बाब समोर आली.
शहरात नुकतेच कोट्यावधी रुपयांच्या निधीतून चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग ते वरोरा रोड बाजार समिती पर्यंत सिमेंट रोड, पेव्हर ब्लॉक आणि ड्रेनेज तयार करण्यात आले आहे. परंतु साई मंदिर ते टिळक चौक आणि लोकमान्य टिळक कॉलेज पर्यंत ड्रेनेज आणि समोरील फुटपाथ अतिक्रमण धारकांनी गिळंकृत केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्ता आणि नालीवर वाहन दुरुस्ती गेराज, पान टपरी, खाद्य पदार्थ विक्रेते, जुता चप्पल दुकान, कापड दुकान, फळ विक्रेते, यांनी अतिक्रमण करुन दुकाने थाटली आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहन पार्किंग आणि पायदळ चालण्याची समस्या निर्माण झाली आहे. करोडो रुपये खर्च करून जर नागरिकांना रस्त्यावर चालता येत नसेल तर त्याला विकास काम म्हणण्यापेक्षा विनाश कार्य म्हणणं योग्य ठरेल.