जितेंद्र कोठारी, वणी : मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत अधिकार असून सर्वांनी मतदान करावे. विशेषकरून तरुण आणि नव मतदारांनी लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी मतदान प्रक्रियेत भाग घेणे गरजे आहे. असे आवाहन येथील गट विकास अधिकारी व नोडल अधिकारी किशोर गज्जलवार यांनी केले. ते येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
येत्या 19 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीत वणी विधानसभा क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढावी. यासाठी उपविभागीय अधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम सुरु आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून सर्व महाविद्यालयांमधील युवक युवती व नवीन नोंदणी झालेले मतदारांशी संपर्क करून त्यांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्याचा शासनाचा उद्देश्य आहे.
यावेळी लोकशाही बळकट करण्यासाठी नव मतदार युवक युवतींनी स्वाक्षरी करून ‘मी मतदान करणार’ असा निर्धार व्यक्त केला. मतदान जनजागृती कार्यक्रमात गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.