जितेंद्र कोठारी, वणी : येत्या 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदर्श आचार संहितेचा तंतोतंतपणे पालन करावे. असे आदेश यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी एका पत्राद्वारे दिले आहे. आदेशाची प्रत जिल्ह्यातील सर्व भारस्थ अधिकारी, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार यांना पाठविण्यात आली आहे.
आदेशानुसार फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, एक्स सारख्या समाज माध्यमावर आपले मत मांडताना किंवा एखाद्याने राजकीय दृष्टीने प्रेरित होऊन संदेश पाठवू नये. तसेच इतरांना पाठविलेल्या संदेशावर रिप्लाय देताना आदर्श आचार संहिता अंमलात असल्याने त्यावर टीका करणे टाळावे. जेणेकरून आपल्याकडून आचार संहितेचा भंग होणार नाही. तसेच आदर्श आचार संहितेचा भंग झाल्यास लोक प्रतिनिधी अधिनियम 1951 नुसार कार्यवाही करण्याचा इशारा आदेशात नमूद करण्यात आला आहे.
काय आहे आदर्श आचार संहिता?
कोणतीही निवडणूक निष्पक्ष आणि मुक्तपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. या नियमांना आचारसंहिता म्हणतात. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होते, जी निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहते. राजकीय पक्ष, सरकार आणि निवडणुकीत सहभागी होणाऱ्या प्रशासनासह सर्व अधिकृत विभागांशी संबंधित सर्वांनी आचारसंहितेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते.