जितेंद्र कोठारी, वणी : तब्बल 18 वर्षांपूर्वी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या हिंसक आंदोलन आणि गोळीबार प्रकरणात आरोपी बनविण्यात आले सर्व शेतकऱ्याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. पांढरकवडा येथील सत्र न्यायालयाने शनिवार 31 ऑगस्ट रोजी सदर प्रकरणाची शेवटची सूनवाई दरम्यान हा निकाल दिला. न्यायालयाच्या ह्या निर्णयामुळे मागील 18 वर्षापासून कोर्टाची पायऱ्या झिजविणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.
8 डिसेंबर 2006 रोजी वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सीसीआय तर्फे कापुस खरेदी सुरु असताना काही शेतकरी आणि सीसीआयच्या ग्रेडर मध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर संतप्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी बाजार समितीत तोडफोड केली. बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले असता पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार केला. त्यामुळे वातावरण आणखी चिघळला आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.
परिस्तिथी हाताबाहेर जात असल्याचे पाहून तत्कालीन पोलीस अधीक्षक अब्दूर रहमान यांनी पोलिसांनी गोळीबारचे आदेश दिले. पोलीस फायरींग मध्ये दिनेश घुगुल या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर 4 शेतकरी गोळीबारीच्या घटनेत जखमी झाले. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये 15 शेतकरी जखमी झाले तर शेतकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत 10 पोलीस कर्मचारीही जखमी झाले.
सदर प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात शेकडो शेतकऱ्या विरोधत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झालेल्या 53 लोकांपैकी काही जण न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना मयत झाले. तर उर्वरित 48 जण मागील 18 वर्षापासून कोर्टाच्या चकरा मारत होते. अखेर 31 ऑगस्ट रोजी न्यायालयाने बाजार समिती गोळीबार प्रकरणी सर्व आरोपीची निर्दोष सुटका केल्याने शेतकरी कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे.