सुशील ओझा, मुकुटबन : भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीवरती मोठ्या संख्येने नागरिक रोजगारासाठी अवलंबून आहे. मात्र, यामध्ये पारंपारिक शेतीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागतं.आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती करण्याला प्राधान्य देत आहे. याचा प्रत्यय वणी तालुक्यातील शेतकरी धीरज बोर्डे यांनी दिला आहे. शेतामध्ये पिकांवर फवारणी करण्यासाठी धीरज बोर्डे यांनी ड्रोन विकत घेतला असून नुकतेच त्यांनी झरी तालुक्यातील अडेगाव येथे शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले
कापूस, सोयाबीन, तूर उत्पादक शेतकऱ्यांना पाठीवर पाच-दहा किलोचं फवारणी यंत्र घेऊन संपूर्ण शेत पालथा घालून पिकांवरती फवारणी करावी लागायची. यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ लागायचा आणि शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. सध्याच्या काळात शेती कामासाठी वेळेवर मजूर मिळत नाहीत. तसेच मजुरी खर्च सुद्धा जास्त वाढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
यावर पर्याय म्हणून वणी तालुक्यातील धिरज बोरडे या युवा शेतकऱ्याने स्वत:चे ड्रोन विकत घेतले आहे. स्वत:च्या शेतीमध्ये याचा वापर करण्याच्या उद्देशाने ड्रोन घेतले असले तरी भाडेतत्वावरील पिकांवर फवारणीचा व्यवसाय मामा अँप अँड ड्रोनचे फाउंडर धिरज बोरडे यांना फायदेशीर ठरत आहे. यावेळी त्यांनी ड्रोनद्वारे फवारणीचे फायदे व ड्रोन खरेदी यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
ड्रोन ची वैशिष्ट्य….
धीरज बोर्डे यांनी विकत घेतलेल्या फवारणी ड्रोन या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे आठ मिनिटांमध्ये हे यंत्र एकरभर पिकांवरती औषध फवारणी करू शकते. त्यासोबतच पिकांवर फवारणी केलं जाणार औषध कीटकनाशक याची देखील याच्यामध्ये बचत होते. जुने यंत्र घेऊन काम करताना शेतकऱ्यांना विषबाधा होत असे मात्र ड्रोन द्वारे हा धोका टाळता येतो. एका जागेवर उभे राहून एक किलोमीटर अंतरावर ती फवारणी करता येते.