वणी टाईम्स न्युज : निवडणूक आयोगाकडून उमेदवारी अर्ज भरण्यापासून तर विड्राल करण्याची प्रक्रिया सोमवारी दुपारी 3 वाजता संपुष्टात आली. त्यामुळे वणी विधानसभा मतदार संघात आता कोण कोणामध्ये लढत होणार हे स्पष्ट झालं आहे. महायुतीचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार, महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे संजय देरकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू उंबरकर यांच्यात तिरंगी लढत होणार असे चित्र दिसत होते. परंतु महाविकास आघाडीचे बंडखोर काँग्रेस नेते संजय खाडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून दाखल आपले अर्ज सोमवारी मागे न घेतल्याने लढाई तिरंगी नसून चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वणी मतदार संघात एकूण 20 इच्छुकांनी 26 उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी 5 अर्ज छाननीत बाद झाले. उर्वरित 16 अर्जदारातून 4 नोव्हेंबर रोजी संभाजी ब्रिगेड पार्टीचे अजय पांडुरंग धोबे, राष्ट्रीय गोंडवाना पक्षाचे प्रवीण रामाजी आत्रामसह आसिम हुसैन मंजूर हुसैन व यशवंत शिवराम बोंडे या दोन अपक्ष अर्जदारांनी आपले अर्ज मागे घेतले. विशेष म्हणजे चारही जणांनी अर्ज मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले.
अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर वणी विधानसभेत खालील प्रमाणे उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.
कोणाला होणार आघाडीत बिघाडीचा फायदा ?
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर व बंडखोर संजय खाडे हे दोघं कुणबी समाजाचे आहे. वणी विधानसभा क्षेत्र हा कुणबी मतदार बहुल क्षेत्र म्हणून ओळखले जाते. लोकसभा निवडणुकांप्रमाणे कुणबी पॅटर्न यशस्वी झाल्यास संजय देरकर निवडून येईल, असे गणित असताना बंडखोर संजय खाडे यांच्या उमेदवारीने देरकरचे गणित बिघडविले आहे. संजय खाडे यांच्या उमेदवारीचा फायदा भाजप उमेदवाराला होणार, अशी चर्चा आहे.
वणी टाईम्सची बातमी ठरली खरी ..
वणी हा काँग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदार संघ असताना शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार आणि निवडून आणणे हा कट्टर काँग्रेसी कार्यकर्त्यांना पचनी पडले नाही. महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याची शक्यता बाबत वणी टाईम्सने दिनांक 27 ऑक्टोबर रोजी बातमी प्रकाशित केली होती. आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या नामांकन रैली मध्ये उपस्थित राहून काँग्रेस व शिवसेनेचे अनेक नेत्यांनी आघाडी धर्म पाळत असल्याचे दाखविले. परंतु काँग्रेसचे बंडखोर उमेदवार संजय खाडे यांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे वरिष्ठ नेत्यांची उपस्थितमुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाचा बातमी –
खदखद : संजय देरकरला उमेदवारीमुळे काँग्रेसच्या गोटात प्रचंड असंतोष