वणी टाईम्स न्युज : वणी विधानसभा मतदार संघ निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी तर्फे वरिष्ठ पत्रकार राजेंद्र उर्फ राजू निमसटकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजू निमसटकर यांनी मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी त्यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ता उपस्थित होते.
मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील रहिवासी राजू निमसटकर मागील अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात आहे. स्पष्ट बोलणारे आणि धडाडीचे पत्रकार म्हणून विधानसभा क्षेत्रातील तिन्ही तालुक्यात त्यांची ओळख आहे. प्रिंट आणि टिव्ही मीडियामध्ये कार्य करताना त्यांनी ग्रामीण भागातील समस्या जवळून अनुभवली आहे. पत्रकारिता सोबतच राजू निमसटकर यांना राजकारणाची आवड असून त्यांची अर्धांगिनी कोलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच आहे.
विधानसभा निवडणूक लढण्याची राजू निमसटकर यांची ही पहिली वेळ आहे. राजू निमसटकर यांचा दांडगा जनसंपर्क आणि तडफदार नेतृत्व लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे मतदार संघातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.