वणी टाईम्स न्युज : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. अवघ्या 15 दिवसांवर निवडणूक आली असून प्रचारासाठी केवळ 12 दिवस राहिले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. महायुती व महाविकास आघाडी यांच्यासह मनसे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. वणी विधानसभा मतदार संघातील मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आज मंगळवार 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आली आहे.
येथील शासकिय मैदान पाण्याची टाकीजवळ सायंकाळी 6 वाजता आयोजित या सभेत राज ठाकरे हे राजगर्जना करणार असल्याची माहिती राजू उंबरकर यांनी दिली. राज ठाकरे हे विदर्भातील आपल्या प्रचार दौऱ्याचा प्रारंभ वणी येथून करणार आहे. राज ठाकरे यांचे मुंबई येथून विमानाने नागपूर आगमन झाले असून नागपूर येथून सायंकाळी 6 वाजता ते सडक मार्गे वणी येणार आहे.
राज ठाकरे यांच्या सभेसाठी शासकीय मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. वणी विधानसभा मतदार संघ तसेच जिल्ह्यातील हजारो नागरिक या सभेत उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे यांच्या सभेत होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश कींद्रे यांचे नेतृत्वात वणी, मारेगाव, शिरपूर, मुकुटबन व पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार, सहा. पोलीस निरिक्षक, पोलीस उप निरीक्षक, पोलीस कर्मचारी, CISF ची बटालियन असे शेकडो पोलीस अधिकारी व कर्मचारी सुरक्षा व्यवस्था सांभाळणार आहे.