वणी टाईम्स न्युज : महाराष्ट्र विधानसभेसाठी उद्या सकाळी पासून मतदानाला सुरुवात होत आहे. जाहीर प्रचार बंद झाला तरी उमेदवार व कार्यकर्ता मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. वणी विधानसभा मतदार संघात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह 6 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. मात्र या निवडणुकीत चौरंगी लढत रंगणार असे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवारामुळे चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे.
या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार (भाजप) विरुध्द महा विकास आघाडीचे संजय देरकर (शिवसेना उबाठा) या दोघांमध्ये थेट लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजु उंबरकर यावेळी पूर्ण ताकतीने निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर काँग्रेस पक्षाचे बंडखोर अपक्ष संजय खाडे यांच्या उमेदवारीमुळे वणी विधानसभेत लढत चौरंगी झाली आहे..
संजीवरेड्डी बोदकुरवार (भाजप)
महायुतीचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार (भाजप) हे मागील 2 टर्म पासून आमदार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सबका साथ, सबका विकास मंत्र आणि मागील 10 वर्षात विधानसभा क्षेत्रात केलेल्या भरघोस विकास कामाचा मुद्दा जनतेसमोर ठेवून ते हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहे. साधे राहणीमान आणि जनतेला सुलभ उपलब्ध होणारे आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. या निवडणुकीत प्रबळ दावेदार म्हणून संजीवरेड्डी बोदकुरवार तिसऱ्यांदा जनतेसमोर गेले आहे.
संजय देरकर -शिवसेना (उबाठा)
महाविकास आघाडीचे संजय देरकर (शिवसेना) हे महायुती शासनामध्ये शेतमालाला कमी भाव, महागाई, आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा मतदारांसमोर मांडून परिवर्तनाचे आवाहन करीत आहे. संजय देरकर हे मुरब्बी राजकारणी असून त्यांनी चार वेळा विधानसभा निवडणूक लढली. निवडणुकीत काँग्रेस पक्षाची साथ मिळाल्याने त्यांचे बलाढ्य वाढले आहे.
राजु उंबरकर (मनसे)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजु उंबरकर यांची ओळख आक्रमक नेते व कामाचा माणूस म्हणून आहे. मतदार संघातील बेरोजगार तरुणांना रोजगार व पीक विम्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. अनेक संघटना व समाज संस्थांनी राजु उंबरकर याला पाठिंबा जाहीर केला आहे. मागील 3 विधानसभा निवडणुकीत त्यांनी भरघोस मते मिळवली. या निवडणुकीत राजू उंबरकर यांनी प्रस्थापितांविरुध्द कडवे आव्हान उभे केले आहे.
संजय खाडे (अपक्ष)
काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज संजय खाडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज कायम ठेवला. मागील 2 वर्षात संजय खाडे यांनी मतदार संघात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. विशेष करून चालते फिरते जनहित केंद्राच्या माध्यमातून त्यांनी गाव खेड्या पर्यंत संपर्क वाढविला. लोक प्रतिनिधीचा नवीन चेहरा म्हणून ते निवडणूक रिंगणात आहे.