वणी टाईम्स न्युज : गेल्या आठवड्यापासून वातावरणातील तापमान कमी होऊन हवेत गारठा वाढून थंडी जाणवत आहे. मात्र विधानसभा निवडणूक प्रचाराने मतदार संघात राजकीय हवा चांगलीच तापत असल्याचे दिसून येत आहे. राजकीय वातावरण तापल्यामुळे नेत्यांच्या प्रचार सभा, आरोप प्रत्यारोप, मतदारांच्या गाठीभेटी, प्रचाराचा भडीमार यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. मतदानाची तारीख जवळ आल्याने प्रचारासाठी देखील कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे उमेदवारांनी प्रचार यंत्रणा गतिमान केल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असून राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभांमधून वातावरण ढवळून निघत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेनंतर महा विकास आघाडीच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे यांनी वणीत सभा घेतली. उमेदवारानी मतदारसंघ पिंजून काढत घराघरातून एकेका मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. उमेदवारांसोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील पायाला भिंगरी लावत प्रचार गतिमान केल्याचे दिसून येत आहे. नेत्यांच्या निवडणुकीकडे पुढे होणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आपली दावेदारी पक्की करण्याची संधी म्हणून स्वतःला झोकून कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. उमेदवार, नेत्यांनी गावा गावातील गट-तट लक्षात घेत मोठ्या कसोशीने दोघांना जवळ ठेवत प्रचार यंत्रणा सतर्क ठेवण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे.
भेटीगाठी, सभा व गावागावातील बैठकांना जोर
प्रचाराची यंत्रणा गावपातळीवर पोहोचवत व्यक्तिगत भेटीगाठी, कॉर्नर सभा, बैठका घेत उमेदवारांनी प्रचार गतिमान केला आहे. गावातील प्रतिष्ठित नागरिक,ज्येष्ठ मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी यांच्या गाठीभेटी सुरू असून यासोबतच गुप्त बैठका, सभा यातून प्रचाराचे वातावरण चांगले तापत आहे.
उमेदवाराचा सोशल मीडियावर प्रचारात भर
सोशल मीडियामुळे प्रचारात अधिकच रंगत येण्यास सुरुवात झालेली आहे. आरोप प्रत्यारोप होत असताना प्रचाराची ही शक्कल लढविली जात आहे. यात व्हॉट्सॲप व फेसबुकचा अधिक वापर होत असल्याचे दिसून येत आहे. तर काही उमेदवार मोबाईलद्वारे रील्स, व्हिडीओ यांचा वापर करुन हायटेक प्रचार करताना दिसत आहे.