वणी टाईम्स न्युज : वणी विधानसभा क्षेत्रात यंदाच्या निवडणुकीत प्रस्थापित राजकीय नेत्यांना मनसे जोरदार आव्हान देणार असल्याचे चित्र दिसत आहे. मागील पाच वर्षात मनसेने विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागापर्यंत पोहचून आपली ताकद दुपट्ट केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रस्थापित उमेदवारांनी मनसेला हल्क्यात घेणे महागात पडू शकते. अशी राजकीय चर्चा कट्ट्यावर रंगू लागली आहे.
मनसेचे उमेदवार राजु उंबरकर यांच्या जनसेवेच्या कार्यातून प्रभावित होऊन ग्रामीण भागातील हजारो तरुणांनी मनसेची कास धरली आहे. मागील 5 वर्षात विधानसभा क्षेत्रातील गावा गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा उघडल्या आहेत. 2009 ते 2019 पर्यंतच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने चांगली कामगिरी केली. परंतु 2024 च्या निवडणुकांमध्ये मनसेने ‘अभी नही तो कभी नही’ चा ध्यास घेऊन कार्यकर्त्यांची मोठी फौज मैदानात उतरविली आहे.
विशेष म्हणजे विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी मनसे सोशल मीडिया प्रचारावर भर देत आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि कॉल सेंटरच्या माध्यमातून मनसे उमेदवार राजू उंबरकर हे स्वतः मतदारांशी सतत संपर्कात आहे. शिवाय बॅनर, पोस्टर, बिल्ला इत्यादी प्रचार साहित्य गावागावात पोहचविण्याचे काम मनसे कार्यालयात युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे यंदाचा निवडणुकीत वेगळा निकाल लागल्यास आश्चर्याची बाब राहणार नाही.