वणी टाईम्स न्युज : 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी राज्यातील महिलांना शासनाकडून पंधराशे रुपयांचा गिफ्ट मिळाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या मोबाईलवर पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज झळकताच महिला दिनाचा त्यांचा उत्साह द्विगुणित झाल्याचा पाहायला मिळाला. फेब्रुवारी महिना संपूनही अनुदान जमा न झाल्याने अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. मात्र शनिवारी बहुतांश महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झाले.
विधानसभा निवडणुकांपूर्व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरून वाढ करुन 2100 रुपये दरमहा देण्याची घोषणा महायुती कडून करण्यात आली होती. मात्र सत्तेत येताच सरकारने घुमजाव केल्याचे दिसत आहे. नुकतेच महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी महिलाना 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्यवेळी घेऊ, असे विधान केल्याने वाढीव अनुदान कधी मिळणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
मार्च महिन्यात मिळणार 2100 रुपये..!
विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 2100 रुपये देणार असल्याचं आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आलं होतं. त्यानुसार महायुती सरकार सत्तेत बसल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची प्रतिक्षा होती. मात्र त्यानंतरही 1500 रुपयेच खात्यात आल्याने महिलांनी याबाबत सरकारला प्रश्न विचारला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत प्रस्ताव मांडल्यानंतर महिलांना 2100 रुपये दिले जातील, असं आश्वासन मंत्री अदिती तटकरे यांनी दिलं. 3 मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. त्यामुळे महिलांना मार्च महिन्यात 2100 रुपये मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.