वणी टाईम्स न्युज : वणी विधानसभेसाठी उमेदवारी अर्जांची आज 30 ऑक्टोबर रोजी छाननी करण्यात आली. उमेदवारी अर्जात तांत्रिक त्रुटींमुळे अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणाऱ्या 4 जणांचे फार्म रीजेक्ट करण्यात आले. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून संजय खाडे यांना शेवट पर्यंत ए बी फार्म मिळाले नसल्याने त्यांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले. असे एकूण 26 अर्जपैकी 21 अर्ज स्वीकार करण्यात आले तर 5 उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले.
उमेदवारी अर्ज बाद झाल्याने अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणाऱ्या संतोष उद्धवराव भादीकर, देवराव आत्माराम वाटगुरे, सुनील गणपतराव राऊत व रत्नपाल बापूराव कनाके या 4 इच्छुकांचे निवडणूक लढण्याचे स्वप्न भंग झाले आहे. तर संजय खाडे यांनी 2 अर्ज भरल्यामुळे त्यांचे अपक्ष उमेदवार म्हणून दाखल एक अर्ज कायम आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 4 नोव्हेंबर अखेरची तारीख आहे. ज्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहे, त्यापैकी 4 नोव्हेंबर पर्यंत कोण कोण उमेदवारी मागे घेणार ? त्यानंतरच लढत तिरंगी होणार की चौरंगी याबाबत चित्र स्पष्ट होईल.
‘फ्रेंडली फाईट’ च्या चर्चेला विराम..
काँग्रेसचे नेते संजय खाडे यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळण्याची शाश्वती होती. मात्र ऐनवेळी वणीची जागा शिवसेना (उबाठा) च्या वाटेला गेल्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. राज्यात काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या दोन पक्षातील उमेदवारांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे वणीतही काँग्रेस पार्टी त्यांना तिकीट देऊन सांगलीचे विशाल पाटील पॅटर्न राबवणार. अशी आशा संजय खाडे यांना होती. परंतु आज सायंकाळी पर्यंत त्यांना काँग्रेस पक्षाकडून AB फार्म देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांचे उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आले.