वणी : शासकीय मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण करून भोगवटदार नोंदी केल्याप्रकरणी तालुक्यातील मोहदा (वेळाबाई) येथील उप सरपंच सचिन ज्ञानेश्वर रासेकर यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. उप सरपंच सचिन रासेकर यांच्या आईच्या नावाने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार माजी सरपंच गौतम अमरसिंग सुराणा यांनी केली होती. अपर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी अपात्रतेसंबंधी आदेश 24 नोव्हे. रोजी पारित केले.
प्राप्त माहितीनुसार गैर अर्जदार सचिन ज्ञानेश्वर रासेकर हे ग्राम पंचायत मोहदा येथील रहिवासी आहे. ग्रामपंचायत निवडणूक 2020-21 मध्ये ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. तसेच दिनांक 24 फेब्रुवारी 2021 घेण्यात आलेल्या सभेत सचिन रासेकर यांची उप सरपंच म्हणून निवड करण्यात आली होती. उपसरपंच सचिन रासेकर यांच्या आई सौ. रंजना ज्ञानेश्वर रासेकर यांची ग्रा. प. मोहदा येथील सन 2015- 16 ते 2019-20 मालमत्ता रजिस्टरमध्ये अनुक्रमांक 291वर भोगवटदार म्हणून नोंद आहे. तसेच सन 2021-22 ते 2024-25 या कालावधीत मालमत्ता रजिस्टरमध्ये अनुक्रमांक 120 व मालमत्ता क्रमांक 120 वर मालक म्हणून सरकार व भोगवटदार म्हणून सौ. रंजना ज्ञानेश्वर रासेकर याची नोंद असल्याचे नमूद केले.
लोकप्रतिनिधीच्या कुटुंबीयांनी शासकीय जमिनीवर केलेल्या अतिक्रमण बाबत मोहदा येथील माजी सरपंच गौतम अमरसिंग सुराणा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून 8 जून 2022 रोजी उपसरपंच सचिन रासेकर यांना पदावरून अपात्र घोषित केले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाविरुद्द उप सरपंच रासेकर यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे अपील केली. विभागीय आयुक्त अमरावती यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे आदेशाला कायम ठेवून 21 ऑक्टो. 2022 रोजी आदेश पारित केले.
विभागीय आयुक्त यांच्या निर्णयाला आव्हान देत उपसरपंच सचिन रासेकर यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी करीत उच्च न्यायालयाने 6 सप्टे. रोजी आदेश पारित करून नव्याने सुनावणी घेऊन 15 दिवसाचे आत प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने दोन्ही पक्षांना नोटीस बजावून 30 ऑक्टो. 2023 रोजी सुनावणी करिता बोलाविले. सुनावणी दरम्यान अर्जदार गौतम सुराणा यांचे वकिलांनी दाखल केलेले पुरावे तसेच ग्रा. प. सचिवाच्या अहवालावरून असे स्पष्ट झाले कि उप सरपंच सचिन रासेकर यांच्या आईने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे सचिन रासेकर यांना मोहदा ग्रामपंचायत सदस्य व उप सरपंच पदावरून अपात्र ठरविण्यात आल्याचे आदेश पारित करण्यात आले.