वणी टाईम्स न्युज :
विधानसभा निवडणुकसाठी महाविकास आघाडीत जागावाटप वरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महायुतीत जागा वाटाघाटीचा वाद संपला असून मविआमध्ये जागा वाटपवरून काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात घमासान सुरू आहे. विदर्भात वणी विधानसभेसह आणखी काही जागेसाठी दोन्ही पक्ष दावा करीत आहे. वणी विधानसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. परंतु काँग्रेस पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. माजी आमदार वामनराव कासावार स्वतः उमेदवारीसाठी आग्रही आहे. तर खासदार प्रतिभा धानोरकर ह्या संजय खाडे साठी लॉबिंग करीत आहे. कासावार यांना उमेदवारीचा पक्षातूनच विरोध होत असल्याची चर्चा आहे.
काँग्रेस आणि युबीटी पक्षात बैठकीचे सत्र अजूनही सुरूच आहे. काँग्रेस पक्षाची आज दिल्लीत महत्वाची बैठक सुरु आहे. माजी आमदार वामनराव कासावार व संजय खाडे हे आपल्या समर्थकांसह दिल्लीत ठाण मांडून आहे. तर दुसरीकडे शिवसेना (उबाठा) कडून उमेदवारी मिळण्यासाठी संजय देरकर यांचा नाव पुढे आहे. जागा वाटपाच्या मुद्द्यावर दोघेही पक्ष अडून बसल्याचं चित्र सध्या दिसत आहे.
विशेष म्हणजे राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांड समोर आपले म्हणणे मांडत शिवसेना ठाकरे गटा समोर झुकणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आघाडीत बिघाड झाल्याचे चित्र दिसताहेत. वणी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत कोण राहणार हे आज रात्री किंवा उद्या स्पष्ट होईल.