वणी टाईम्स न्युज : मागील एका वर्षापासून केलेल्या कामाचे बिल न मिळाल्याने आर्थिक अडचणीत आलेले सर्व कंत्राटदाराने मंजूर आणि चालू असलेले रस्त्यांचे सर्व बांधकाम थांबविले आहे. शासनाकडे वारंवार मागणी आणि आंदोलनात्मक पवित्रा घेऊन ही राज्य शासनाने आवश्यक निधीची उपलब्धता करून दिली नाही. त्यामुळे ठेकेदारांवर पैसे द्या.. पैसे द्या. देवाभाऊ पैसे द्या.. म्हणायची वेळ आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील एकट्या सार्वजनिक बांधकाम मंडळाकडे शासकीय कंत्राटदारांचे 650 कोटी रुपयांचे बिल प्रलंबित आहे. शिवाय निविदा भरताना जमा केलेली सुरक्षा राशीसुद्धा कंत्राटदारांना परत मिळाली नाही. त्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग वणी अंतर्गत तब्बल 30 कोटी रुपयांचे चालू असलेले रस्त्यांचे बांधकाम कंत्राटदारांनी थांबविल्याची माहिती आहे.
एवढंच नव्हे तर “महाराष्ट्र शासनाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे वरील काम बंद करण्यात आले आहे. 50 टक्के निधी उपलब्ध केल्यानंतर काम सुरु करण्यात येईल. सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.” असा फलक वणी विभागात एका रस्त्यावर लावण्यात आला. नुकतेच वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी त्या फलकाची प्रतिलिपी घेऊन विधानसभेच्या बाहेर निदर्शन केले होते.
अर्धवट बांधकामामुळे सामान्य नागरिकांचे हाल
केलेल्या कामाची रक्कम न मिळाल्यामुळे कंत्राटदारांनी चालू असलेले रस्ते बांधकाम अर्धवट स्थितीत सोडून दिले आहे. रस्त्यावर पडलेली गिट्टी, मुरूम तसेच एका बाजूने उंच रस्त्यांमुळे वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर वाहनाच्या वर्दळीमुळे उडणाऱ्या धुळीतून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
कंत्राटदारांच्या मोबाईलवर देवाभाऊ पैसे द्या.. ची रिंगटोन..!
प्रलंबित बिलांची रक्कम तत्काळ देण्याची मागणी घेऊन विदर्भातील शासकीय कंत्राटदारानी 25 फेब्रुवारी रोजी अमरावती येथे मुख्य अभियंता (सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग) कार्यालयाचा घेराव घातला होता. त्यावेळी एका भजनप्रेमी यांनी पैसे द्या.. पैसे द्या.. देवाभाऊ पैसे द्या. असे गायन केले होते. गायलेले गीत कंत्राटदारांना एवढे आवडले की अनेक कंत्राटदाराने त्या गीताचा MP3 मध्ये कन्व्हर्ट करुन आपल्या मोबाईलच्या रिंगटोन म्हणून ठेवली आहे.
बघा व्हिडिओ :