जितेंद्र कोठारी, वणी : शहरातील तरुण व युवा पिढीसह अनेक अल्पवयीन मुलं मुली सिगारेट, गुटखा, दारु तसेच गांजा व एमडी सारख्या ड्रग्सच्या विळख्यात अडकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अमली पदार्थांचा नशा करण्यासाठी मुलं चिलम तसेच गोगो पेपरचा वापर करीत आहे. शहरातील काही पान टपऱ्यांवर 10 रुपयात 3 ‘गोगो’ पेपर विकल्या जात असल्याची माहिती आहे. चीलमचा पर्याय म्हणून गोगो पेपरचा वापर वाढला आहे. या पेपरमध्ये तंबाखू किंवा अमली पदार्थ भरून नशा केला जातो.
आजच्या पिढीला दारूचे व्यसन काही नवीन नाही. मात्र आता त्यांच्या आयुष्यात गांजा सारख्या अंमली पदार्थांची‘एन्ट्री’ झाल्यामुळे ही पालकांसाठी चिंतेचा बाब बनली आहे. वणी शहर व परिसरात 15 ते 30 वयोगटातील तरुण कधी भरदिवसा तर कधी रात्रीच्या सुमारास मद्यपान, सिगारेट व गांजाचे व्यसन करून वाढदिवस साजरे करताहेत. परिसरात काही निर्जन ठिकाण व शहरालगत मोकळे ले-आऊट कडे फेरफटका मारला तर खळबळजनक दृष्य समोर दिसून येते. या ठिकाणी तरुण व अल्पवयीन मुलचं नव्हे तर मुलीसुद्धा सिगारेटचे झुरके व मद्यप्राशन करताना आढळून येतात.
अल्पवयीन मुलांना सिगारेट, खर्रा, गुटखा व दारु शहरातील पान सेंटर व दारु दुकानांवर सहज उपलब्ध आहे. तर काही विशिष्ठ ठिकाणी आणि व्यक्तीकडून गांजा, एमडी ड्रग्स पुरवठा केले जात असल्याची माहिती आहे. चिंतेची बाब म्हणजे ड्रग्स विक्री रॅकेटचे म्होरके शाळा महाविद्यालय परिसरात फिरुन अल्पवयीन मुलांना हेरून नशेच्या आदी करत आहे. मागील एक दोन वर्षापासून शहरात गांजा व इतर मादक पदार्थ ओढणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. नशेच्या गुंगीत हे अल्पवयीन मुलं कोणाशीही वाद करणे, मारहाण, भरधाव दुचाकी चालवून अपघात करणे, मुलींची छेड काढणे व इतर गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहे.
अमली पदार्थांची विक्री व पोलिसांची भूमिका
शहरात मोठ्या प्रमाणत गांजाची विक्री व वापर होत असताना मात्र पोलीस प्रशासन व अन्न व औषध विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचे बोलले जाते. लहान मुलांना माहिती आहे की गांजा कुठं मिळतो, परंतु पोलिस गुप्तचर यंत्रणेला याबाबत खबर नसेल हे शक्यच नाही. गांजा, गुटखा, सुगंधित तंबाखू तस्करी विरुध्द पोलीस विभाग कारवाई का करत नाही ? यामागचा हेतू लोकांनाही कळलेलं आहे. यावर वेळीच आळा घातला गेला नाही तर भावी पिढीचे आयुष्य तर नष्ट होईलच शिवाय शहरात गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढेल यात काही शंका नाही.
पालकांनो वेळीच सावध व्हा..!
नशेचे प्रमाण वाढल्याने आता पालकांनी सावधान होऊन आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. आपला मुलगा, मुलगी घराचे बाहेर जाऊन काय करतो ? त्याचे मित्र कोण आहे ? याबाबत माहिती ठेवावी. कोचिंग क्लासेस, बर्थ डे पार्टीच्या नावावर रात्री उशीर घरी येणाऱ्या मुलांबाबत चौकशी करा.