वणी टाईम्स न्युज : येथील लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे रविवार 15 सप्टेंबर रोजी भव्य सुपरस्पेशालिटी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार वामनराव कासावार यांचे नेतृत्वात आयोजित या शिबिरात 450 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली. लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेंद्र लोढा आयोजित या शिबिराचा उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. तर प्रमुख अतिथी म्हणून महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे होत्या.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना खा. प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की आरोग्य शिबिर नेहमीच होतात, मात्र सुपरस्पेशालिटी शिबिराचे आयोजन करणे हा एक स्तुत्य उपक्रम आहे. गंभीर आजार असलेल्या रुग्णांना याचा नक्कीच फायदा होईल. संध्या सव्वालाखे यांनी वणी काँग्रेस नेहमी विविध कार्यात अग्रेसर राहतात. संपूर्ण विधानसभेत अशा शिबिराचे आयोजन करणे हे कौतुकास्पद आहे. असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यावेळी वामनराव कासावार यांनी शिबिरार्थी रुग्णांची विचारपूस करीत त्यांच्याशी संवाद साधला.
या शिबिरात मेंदुरोग तज्ज्ञ डॉ. प्रतिक उत्तरवार, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप वरघने, मुत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण पंत व आनंद बैद, पोटविकार तज्ज्ञ डॉ. सागरा बोथरा, न्यूरो व स्पाईन तज्ज्ञ डॉ. सुशील भोगावार, डॉ. अंकित डवरे, जॉइंट रिप्लेसमेंट तज्ज्ञ डॉ. अंबर डवरे, वंध्यत्व व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. प्रमोद येरणे व डॉ. ऐश्वर्या डवरे यासह बालरोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन, नेत्ररोगतज्ज्ञ, सर्जरी तज्ज्ञ इत्यादींनी रुग्णांची तपासणी केली.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी काँग्रेसचे वणी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच लोढा हॉस्पिटलच्या चमूंनी परिश्रम घेतले. शिबिरात मोठ्या संख्येने वणी शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्ण सहभागी झाले होते. पुढील शिबिर हे शनिवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी मारेगाव येथील लोढा हॉस्पिटल येथे होणार आहे. या शिबिराला मोठ्या संख्येने मारेगाव तालुक्यातील रुग्णांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे.