वणी : शहरात प्रदूषणाची समस्या गंभीर झाली असून हवेतील वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांना श्वास घेण्यात त्रास जाणवत आहे. थंडीचे दिवस सुरु होताच शहरात वायू प्रदूषण वेगाने वाढत आहे. हवेतील कोळसा व धुळीकणाच्या थरात वाढ झाली असून ती आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे दमा, त्वचा संबंधित रोग, कॅन्सर यासारख्या गंभीर आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. कोळसा खाणीमधून होणारी कोळशाची वाहतूक, कोल डेपो व कोळसा रॅक सोबतच रस्त्यावरील धुळीमुळे प्रदूषणाची समस्या आणखी गंभीर झाली आहे. हिवाळ्यामुळे दूषित हवा वर जात नसल्याने प्रदूषणात भर पडत आहे. प्रदूषण वाढल्याने नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत. तसेच खोकला, कफ, डोळ्यांची जळजळ व इतर आजारांचे रुग्ण वाढत आहेत.
शहरातील बहुतांश रस्ते काँक्रीटचे झाले असले तरी या रस्त्यांवर पडलेली निर्माण सामुग्री, रेतीचे ढीग आणि धुळीचे थर जमा असल्यामुळे वणीकरांची धूळधाण उडविली आहे. सिमेंट रस्ते तयार केल्यानंतर ते पाण्याने धुवून काढणे आवश्यक आहे. ही कामे रस्ते ठेकेदाराने केली नाहीत. शहरातील नांदेपेरा मार्गावर सर्वात जास्त वायू प्रदूषण जाणवत आहे. या मार्गावर असलेल खड्डे बांधकाम विभागाने तात्पुरते बुजवले असून वाहनाच्या ये-जा मुले माती सारखी हवेत उडत राहते. शहरात ठिकठिकाणी रेती, गिट्टी, मुरूम, डस्टचे ढिगारे रस्त्यावर असताना नगर परिषद कडून कोणतीही कारवाई केली जात नाही.
लोकसंख्येचा प्रमाणात शहरात वाहनांची संख्या अमर्यादित झाली आहे. त्यातही तीनचाकी प्रवासी ऑटोची संख्या बेहिसाब वाढली आहे. डिझलवर चालणारे ऑटो, मालवाहू वाहन व राज्य महामंडलच्या एस. टी. बसेज प्रदूषणात भर घालत आहे. कालबाह्य झालेले प्रवासी ऑटो शहरातील रस्त्यांवर बिनधास्त धावत असताना परिवहन विभाग व वाहतूक शाखा डोळे बंद करून आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार हवेतील पी एम चे प्रमाण 60 मायकोग्राम प्रती घनमीटरपेक्षा जास्त नसावे. पण शहरात ती पातळी केव्हाच ओलांडली आहे. शहरातील धुळीकणांचे (Particulated matter) प्रमाण वेगाने वाढत असताना आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न लोकप्रतिनिधींच्या प्राधान्य यादीतून हरविल्याचे जाणवत आहे.
प्रदुषणाचा पिकांवरही दुष्परिणाम
वणी तालुक्यात कोळसा, रेती, चुनखडी, सिमेंट, गिट्टी वाहतूक करणाऱ्या जड वाहनाच्या दळणवळणमुळे पिकांवरही दुष्परिणाम होत आहे. मार्गालगत असलेले शेतातील पिकांच्या झाडांवर कोळशाची भुकटी व धूळ जमा होऊन पिकांचे आतोनात नुकसान होत आहे. हवेतील प्रदुषणामुळे तालुक्यात कापूस, सोयाबीन, तूर, मुग, भुईमुगच्या उत्पादनात घट झाली आहे.