वणी टाईम्स न्युज : वणी तालुक्यातील मंदर गावाजवळ तब्बल 1800 वर्षांपूर्वी सातवाहन आणि पश्चिम क्षत्रप राज्याचे मोठे शहर अस्तित्वात असल्याचा दावा प्रख्यात पुरातत्व संशोधक व इतिहास अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे. मंदर गाव शिवारात धंदर नावाने ओळखण्या जाणाऱ्या रीठाचा संशोधन करुन व त्या ठिकाणी आढळलेल्या अनेक प्राचीन मूर्ती, वस्तु व नुकतेच एका शेतकऱ्याने जपून ठेवलेली प्राचीन नाणीचे अभ्यास करून त्यांनी हा दावा केला आहे.

प्रा. सुरेश चोपणे हे मागील अनेक दिवसांपासून या भागाचा अभ्यास करीत आहे. वणी तालुक्यातीलच कायर येथे केलेल्या उत्खननात सातवाहन काळातील पुरावे सापडली आहेत. त्यामुळे इथेसुद्धा सातवाहन राज्य होते असे बहुतेक इतिहास अभ्यासकांचे मत आहे. मंदर येथील शेतकऱ्याजवळ संग्रहित तांब्याची नाणी तिसऱ्या शतकातील पश्चिम क्षत्रप राजाची असून त्यांना ड्रेक्मा असे म्हटले जाते.
येथे आढळलेल्या पुराव्यावरुन धन्दर हे जवळ जवळ 2 किमी परिसरात वसलेले गाव होते. मध्ये श्रीमंत लोकांची विटांची घरे तर सभोवताली मातीची लहान घरे होती. गावाला पाणी पुरवठा व्हावा म्हणून पूर्वेला आणि उत्तरेला दोन मोठे तलाव बाधले होते, ते आजही शाबूत आहेत. तलावाच्या बाजूला असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी दगडाचे चौरस उघडे पंचायत सभागृह, मृताना दफन केलेले स्थळ दिसतात. सर्वत्र मोठ मोठी फुटलेले रांजन, मटके, दिवे, विटा, काळ्या खडकाची पाटे-वरवंटे विखुरली दिसतात. अनेक काळ्या दगडांची गृह उपयोगी वस्तू, स्त्रियांच्या मुर्त्या, गाय, बैलांची हाडे सुद्धा मिळाली आहेत.
आज ह्या परिसरात शेती असून ह्या रीठाचा मधील भाग 10 फुट उंच आहे. त्या ठिकाणी पडलेली घरे दबलेली आहेत. शासनाच्या पुरातत्व विभागाने या ठिकाणी उत्खनन केल्यास अनेक वस्तू, नाणी, अलंकार आणि पुरावे आढळू शकतात. असा दावा प्रा. चोपणे यांनी केला आहे. त्यांनी केलेले संशोधनाचा अहवाल ते पुरातत्त्व विभाग तसेच नागपूर विद्यापीठ येथे पाठविणार असल्याचे प्रा. चोपणे यांनी सांगितले.