जितेंद्र कोठारी, वणी : एकीकडे लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, तर दुसरीकडे लाडकी बहिणींची फसवणूक करणारे भामटे शहरात सक्रिय झाले आहे. राष्ट्रीयकृत बँकाकडून कर्ज व विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याची बतावणी करून महिलांकडून पैसे उकळले जात असल्याचे प्रकार समोर आले आहे. मात्र अद्याप कर्ज न मिळाल्याने या महिलांवर डोक्यावर हात लावण्याची वेळ आली आहे.
नुकतेच एका भामट्याने राष्ट्रीयकृत बँका कडून स्वस्त व्याज दरात 10 लाख पर्यंत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील काही महिलांकडून प्रोसेसिंग फी च्या नावावर 20-20 हजार फोन पे आणि गुगल पे ॲप वरून आपल्या खात्यात टाकायला भाग पाडले. मात्र बरेच दिवस उलटून ही महिलांना कर्ज मिळाले नाही. महिलांनी संबंधित व्यक्तीला फोन करून विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिले. त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या महिलांनी सदर ठकसेन विरुद्ध वणी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली.
कामगार योजने अंतर्गत किचन सेट व मुलांना स्कॉलरशिपचा लाभ मिळवून देण्याच्या नावावर शहरात काही महिला घरोघरी जाऊन 500 ते 1200 रुपये घेऊन फार्म भरत असल्याची माहिती आहे. नगर परिषद मध्ये सेटिंग असल्याचे सांगत सर्व कागद पत्रांची पूर्तता करण्याच्या नावावर पैसे उकळण्यात येत असताना मात्र स्थानिक प्रशासन झोपेत असल्याचे दिसत आहे.