वणी टाईम्स न्युज: शहरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत असताना आता खेड्यापाड्यातून दुचाकी लंपास होण्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होत आहे. शहरातून जवळच असलेल्या मंदर गावातून 8 मे च्या रात्री घरासमोर उभी असलेली होंडा युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक MH 29 BG 7993 ही अज्ञात चोरट्याने लंपास केली.
तक्रारदार मंगेश अरुण कोल्हे (32) रा. मंदर ता. वणी यांनी 10 मे रोजी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी 8 मे रोजी सायंकाळी त्याची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल घरासमोर हॅण्डल लॉक करुन ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मोटरसायकल ठेवलेल्या ठिकाणी आढळली नाही. गावात इकडे तिकडे शोध घेऊन ही मोटरसायकल कुठेही मिळून आली नाही. त्यामुळे कुणीतरी अज्ञात चोरट्याने हॅण्डल लॉक तोडून त्यांची मोटरसायकल किंमत 40 हजार चोरी केल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.