वणी टाईम्स न्युज : काकाच्या घरी राहून शिक्षण घेत असलेली अल्पवयीन पुतणी तसेच मावशीकडे राहायला आलेली अल्पवयीन भाची घरून बेपत्ता झाल्याची घटना मारेगाव तालुक्यात समोर आली. दोन्ही घटनेबाबत फिर्यादी काका व मावशी हिने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
पहिल्या घटनेत, पुणे येथे राहणाऱ्या फिर्यादी यांनी तक्रार नोंदविली की त्याची 16 वर्ष 8 महिन्याची अल्पवयीन पुतणी लहानपणा पासून त्याच्याकडे राहून शिक्षण घेत आहे. फिर्यादी याची पत्नी प्रसूतीसाठी दोन महिन्यापूर्वी मारेगाव तालुक्यातील तिच्या माहेरी आली असून त्याची पुतणीही तिच्या सोबत आली होती. दिनांक 23 एप्रिल रोजी त्याची पुतणी घरून बेपत्ता झाली. गावात विचारपूस केली असता अल्पवयीन मुलगी गावातीलच अर्जुन चव्हाण (20) सोबत गेल्याची माहिती मिळाली. त्यावरून फिर्यादी काका यांनी आरोपी अर्जुन चव्हाण विरुद्ध त्यांची अल्पवयीन पुतणीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली.
दुसऱ्या घटनेत मारेगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेनी तक्रार नोंदविली की, तिच्या बहिणीची 17 वर्ष 3 महिन्याची अल्पवयीन मुलगी मागील दीड महिन्यापासून तिच्याकडे राहत होती. 22 एप्रिल रोजी पहाटे उठून फिर्यादी महिलेनी घरातील सर्व कामे आटोपली तरी तिची भाची उठली नाही म्हणून ती तिला उठवायला गेली असता ती खोलीत दिसली नाही.
बहिणलेक बाबत इकडे तिकडे व शेजाऱ्यांना विचारणा केली असता ती सकाळी 7 वाजता संडासचा डब्बा घेऊन गावाबाहेर जात असल्याचे गावातील एका व्यक्तींनी सांगितलं. गावच्या बाहेर रस्त्यावर व नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. शेवटी मुलीच्या मावशीने मारेगाव पोलीस ठाणे गाठून अज्ञात इसमाने तिच्या अल्पवयीन भाचीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार नोंदविली. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी कलम 137(2) नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.