वणी टाईम्स न्युज : महिला, तरुणी तसेच अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वणी उपविभागात 3 दिवसात 3 अल्पवयीन मुलीनी घरातून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेपत्ता मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी, मारेगाव व शिरपूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत एका गावात आपल्या आईवडील व भावासह वास्तव्यास 17 वर्षाची मुलगी 23 जून रोजी सायंकाळी 4 वाजता पासून घरातून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली. गावातीलच आशिष नावाचा मुलाने त्याच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याचा संशय फिर्यादी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मारेगाव पोलिसांनी आरोपी आशिष (22) विरुध्द कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला.
शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावातील पती पत्नीने 25 जून रोजी शिरपूर पोलीस ठाण्यात त्यांची 16 वर्षाची अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात इसमाने 24 जून रोजी फुस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. मोल मजुरी करणारे आईवडील कामावरून सायंकाळी घरी आले असता घराला कुलूप लावून होता. त्यांनी शेजाऱ्यांना मुलगी कुठे गेली असे विचारले असता ती दुपारी 2 वाजता दरम्यान बॅग घेऊन घराबाहेर गेल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.
वणी येथील एका वार्डात आपल्या आई व भावासह वास्तव्यास 16 वर्षाची मुलगी 25 जून रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान घरातून निघून गेली. फिर्यादी आईने दिलेल्या तक्रारीनुसार ती लोकांचे घरी घरगुती कामे करण्यासाठी गेली असता दुपारी 1 वाजता दरम्यान मुलीने आपले कपडे बॅग मध्ये भरुन लहान भावाला कामाला जातो असं म्हणून निघून गेली. सायंकाळी पर्यंत मुलीची वाट बघितली असता ती परत आली नाही. तसेच तिचा मोबाईल फोनही बंद आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 363 अन्वये गुन्हा दाखल केला.