जितेंद्र कोठारी, वणी : उकणी कोळसा खाणीत आढळलेले मृत वाघाच्या शरीरातून दात व नखं लंपास करणाऱ्या 4 वेकोलि कर्मचाऱ्यांना वन विभागाने अटक करून त्यांच्या ताब्यातून वाघाचे 4 सुळे दात व 3 नखं जप्त केले. मात्र मृत वाघाचे आणखी काही अवयव अद्याप गायब असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. वाघाच्या कुजलेल्या मृतदेहाजवळ वन विभाग पथकाला 6 नखं मिळाले होते. तर 3 नखं आरोपींकडून जप्त करण्यात आले. उर्वरित नखं आणि एक पंजा अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे चौकशीनंतर आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वन अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
उकणी कोळसा खाणीतील मुख्य रस्त्यावर 7 जानेवारी रोजी मृत वाघाचा सांगाडा आढळून आला होता. ही माहिती मिळताच वणी येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत वाघाचे शवविच्छेदन अहवालामध्ये वाघाची वय 3 ते 4 वर्ष असून 12 ते 13 दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. बोअरवेलसाठी लावण्यात आलेले रोहित्राच्या विजेचा धक्का लागून वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता.
पंचनाम्याच्या वेळी वाघाचे दात आणि नखे गायब असल्याचेही स्पष्ट झाले होते. ते कोणी लंपास केले, याचा शोध वन अधिकाऱ्यांनी सुरू केला. तेव्हा हे अवयव वेकोलिच्या नीलजई कोळसा खाणीत कामावर असलेले काही कर्मचाऱ्यांनी लंपास केल्याची टीप तपासादरम्यान वनअधिकाऱ्यांना मिळाली. त्यावरून खात्री करत वनअधिकाऱ्यांनी संशयित चारही आरोपींना अटक केली. या प्रकरणात अटक केलेले आरोपी आकाश धानोरकर व सतीश मांढरे यांना शुक्रवारी न्यायालयाने जामीन दिला, तर नागेश हिरादेवे व रोशन देरकर या दोघांना वन कोठडी सुनावली.
सदर कारवाई एसीएफ संगीता कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरएफओ आशिष देशमुख, क्षेत्र सहायक एस. आर. राजूरकर, वनरक्षक एस. ए. वाघ यांच्यासह वनविभागाच्या पथकाने केली. मृत वाघाचे अवयव चोरल्याच्या घटनेचा उलगडा झाला. मात्र या वाघाच्या मृत्यूसाठी नेमके कोण जबाबदार आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
आरोपीची प्रकृती धोक्याबाहेर..
दरम्यान शुक्रवारी सायंकाळी फॉरेस्ट ऑफिसच्या शौचालयात दुपट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या नागेश हिरादेव नामक आरोपीचे चंद्रपूर येथे उपचार सुरु असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सहा.वन संरक्षक यांनी दिली. अटकेतील वेकोलि कामगारांचे वन्यजीव तस्करांसोबत काही संबंध आहे का ? या दिशेनेही वन विभाग चौकशी करीत आहे.
वाचा संबंधित बातमी –
ब्रेकिंग : मृत वाघाचे दात व नखं चोरणारे 4 वेकोलि कर्मचाऱ्यांना अटक